नवलच! गुलाबजामवरुन भिडले नातेवाईक आणि केटरर्स
पुण्यात लग्नाच्या मांडवातच तुफान हाणामारी, हडपसर पोलिसात गुन्हा दाखल
पुणे दि २७(प्रतिनिधी)- सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. पुण्यात देखील विवाहसाठी अनेक मंगल कार्यालय लग्नासाठी फुल्ल आहेत.पण एका लग्नसोहळ्यात शिल्लक राहलेले गुलाबजाम घरी नेण्याच्या कारणावरून नातेवाईक आणि केटरर्सचालक यांच्यात हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी व्यवस्थापक दिपांशु गुप्ता यांनी फिर्याद दिली आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब ग्रील हॉटेल येथे गुप्ता हा व्यवस्थापक म्हणून काम करतो. त्याचे मालक कमलदिपसिंग यांनी शेवाळवाडी येथील राजयोग मंगल कार्यालय चालविण्यास घेतले आहे. रविवारी तेथे लोखंडे आणि कांबळे परिवाराचा विवाह होता. हा हॉल संजय लोखंडे यांनी बूक केला होता. जेवणाच्या व्यवस्थेचे काम फिर्यादी गुप्ता यांच्याकडे होते. दीड वाजता लग्न पार पडल्यावर सर्व पाहुण्यांचे जेवण झाले. सायंकाळी सहाच्या सुमारास वरपक्षाकडील व्यक्तीने राहिलेले जेवण सोबत घेऊन जायचे असल्याचे सांगितले. त्यासाठी काही हरकत नसल्याचे गुप्ता यांनी सांगितल्यावर ती व्यक्ती नातेवाइकांसह राहिलेले जेवण डब्यात भरत होती. त्यातील एक जण गुलाबजाम डब्यात भरू लागला. मात्र, ‘हे गुलाबजाम तुमचे नाहीत. उद्याच्या लग्नाच्या जेवणासाठी तयार केलेले आहेत. ते घेऊन जाऊ नका,’ असे गुप्ता यांनी सांगितले. त्यामुळे शाब्दिक वाद वाढून तिघांनी गुप्ताला मारहाण केली.
आरोपींनी केलेल्या मारहाणीत गुप्ता जखमी झाले आहेत. या घटनेनंतर गुप्ता यांनी हडपसर पोलिस ठाणे गाठत आरोपींवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी देखील याची दखल घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे.