
‘आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय…’
पुण्यात जेलमधून सुटलेल्या गुन्हेगाराची मिरवणूक, रॅलीत नागरिकांना शिविगाळ, व्हिडिओ व्हायरल
पुणे – पुणे शहरात मोक्का प्रकरणातील कुख्यात गुंडाची कारागृहातून सुटका झाल्यानंतर आलिशान कारमधून मिरवणूक काढण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलीसांकडुन त्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील येरवडा जेलमध्ये मोक्कांतर्गत प्रफुल उर्फ गुड्या गणेश कसबे अटकेत होता. तो दोन दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आला. पण तो बाहेर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याची अलिशान कारमधून मिरवणूक काढली तसेच ‘आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय…’ म्हणून रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली. तसेच या रॅलीची व्हिडिओ देखील त्याने बनवला होता आणि सोशल मीडियावर शेसर केला होता. विशेष म्हणजे त्यानंतर नागरीकांनी व्हिडिओ आणि घडलेल्या घटनेची माहिती लक्ष्मी नगर (शास्त्रीनगर) पोलीस चौकीमध्ये दिली होती. पण कारवाई झाली नव्हती. मात्र आता पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. मोक्कामध्ये आत असलेला आरोपी प्रफुल उर्फ गुड्या कसबेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कसबे सह एकूण १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अॅक्शन घेतली आहे. याबाबत पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, या रॅलीची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला नोटीस बजावली होती. त्यानंतर तो पसार झाला आहे़. पोलीस त्याचा शोध घेत आहे. गेली साडेतीन वर्षे येरवडा तुरुंगात काढल्यानंतर नुकताच गुड्या कसबेला जामीन मंजूर झाला होता.
लक्ष्मीनगर येथील रहिवाशांच्या घरात शिरुन घरांची तोडफोड करुन रस्त्यावर लावलेली वाहने फोडून कसबेच्या टोळीने दहशत माजविली होती. ही घटना जुलै २०२१ मध्ये घडली होती. त्यानंतर येरवडा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, दहशत माजविणे, असे गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात गुंड्या कसबेसह १४ जणांना अटक केली होती.