शरद पवारांबाबत आक्षेपार्ह विधान..!राज्यभरातून टीकेची झोड उठताच सदाभाऊ खोत नरमले, व्हिडीओच्या माध्यमातून केली दिलगिरी व्यक्त
राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर आमदार तथा माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठत आहे.
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने तर खोत यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. दरम्यान, सध्याची राजकीय परिस्थित पाहून तसेच केलेले विधान निवडणुकीत अडचणीचे ठरण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर सदाभाऊ खोत नरमले असून त्यांनी केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. खोत यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
व्हिडिओच्या माध्यमातून ही दिलगिरी व्यक्त करत असताना खोत यांनी ग्रामीण भाषेचा दाखला दिला आहे. भाषण करताना मी वापरलेली भाषा ही गावगाड्याची भाषा आहे, असे ते म्हणाले. “कोणाच्याही व्यंगाला उद्देशून बोलण्याचा माझा हेतू अजिबात नव्हता. ही पूर्णपणे गावगाड्याची भाषा आहे. परंतु, काही लोकांनी माझ्या विधानाचा शब्दांचा विपर्यास केला. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर ते शब्द मी मागे घेतो. तसेच मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे खोत यांनी म्हटले आहे.