नाशिकमध्ये पुन्हा एकदा बर्निंग बसचा थरार
सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या धावत्या बसने घेतला पेट, व्हिडिओ व्हायरल
नाशिक दि ८(प्रतिनिधी)- नाशिक- औरंगाबाद रोडवरील खासगी बसला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील वणी येथे एका बसला आग लागल्याची घटना घडली. पण सुदैवाने बसमधील प्रवासी बचावले आहेत.
नाशिकच्या वणी सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या महापरिवहनच्या चालत्या बसने अचानक पेट घेतला. बसला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. पण प्रसंगावधान राखत प्रवाशी खाली उतरले. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसला आग लागल्याचे कळताच स्थानिक तरुणांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
नाशिकमध्ये पहाटे बसने पेट घेतला त्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच परिवहनच्या बसला आग लागल्याने अनेकांचे धाबे दणाणले होते. पण वेळीच सर्व प्रवासी बाहेर पडल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे जिवीतहानी टळली आहे.