
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. मुलाची कस्टडी आता त्याच्या आत्याकडे असणार आहे. कारण मुलाचे आई-वडील आणि आजोबा हे देखील तुरुंगात आहेत.
पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असून बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. मुलाची आत्या पूजा जैननं हेबियस कॉर्पसअंतर्गत दाखल केलेली याचिका हायकोर्टाने स्वीकारली होती. मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश जारी केले आहेत. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
आदेशात नमूद केले आहे की, 22 मे 2024, 5 जून 2024 आणि 12 जून 2024 चे बालहक्क न्यायालयाचे जे आदेश आहेत, त्यामध्ये विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले होते, ते अवैध आहे. त्यामुळे ते आदेश रद्द झाले आहेत. त्यामुळे विधीसंघर्षित बालकाला तातडीने सोडावे लागणार आहे, त्याचा ताबा आत्याकडे देण्यात येणार आहे. आता जे आदेश आले आहेत, त्यामध्ये पोलिसांबाबत काहीही म्हटलेले नाही.