पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरेंटीवर जनतेचा अढळ विश्वास
चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा, 'इंडि'ला मात देत 'भारत' जिंकला, भाजपाच्या विजयानंतर महाराष्ट्रातही जल्लोष
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या लोकप्रियतेमुळे भाजपाच्या ऐतिहासिक व अभूतपूर्व विजयाची पताका डौलाने फडकू लागली. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वावर जनतेच्या अढळ विश्वासासह स्त्री शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंबे या चार अमृतस्तंभाचा होणारा शाश्वत विकास म्हणजे आजचा विजय आहे, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ राज्याच्या निवडणुकीत भाजपाने विजय मिळविला. या विजयाचा भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, गृहमंत्री अमित शाह यांच्या कुशल रणनीतीचा, भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या संघटन कौशल्याचा तसेच त्या त्या राज्यातील नेतृत्वाचा हा विजय आहे. या अद्भुत विजयात योगदान देणारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. कारण, ‘इंडि’ला मात देत ‘भारत’ जिंकला आहे. असे बावनकुळे म्हणाले. संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे, आत्मनिर्भर व जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. मागील साडेनऊ वर्षांत देशासाठी अनेक निर्णय घेतले त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केले. महिला सक्षमीकरणाच्या ज्या योजना राबविल्या. गरीब जनतेसाठी अन्न सुरक्षा योजना राबविली. जसा तिन्ही राज्यात भाजपाचा विजय झाला तसाच महाराष्ट्रातही भाजपाचा विजय होणार आहे. महाराष्ट्रात महायुतीचे ४५ प्लस खासदार, २२५ प्लस आमदार निवडून येतील, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. देशात ३५० प्लस एनडीएचे खासदार निवडून येतील असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
मोदीजींवर कॉंग्रेसने टीका केली होती, आता जनतेने कोण पनौती आहे हे दाखवून दिले आहे. कॉंग्रेसने मागील ६५ वर्षे अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार आणि गरीब कल्याणाचे काम केले नाही. मोदींनी केलेल्या कामाचा हा विश्वास आहे. त्यांच्या स्वच्छ सरकारला मतदान केले आहे. सुवर्णकाळातील भारत निर्माण करण्याची क्षमता मोदींमध्येच आहे, हे प्रत्येक मतदाराला माहिती आहे. देशातील महिला मतदार मोदीजींच्या मागे उभे आहेत. मोदींवर टीका करणे जनतेला आवडत नाही हे या निकालावरून स्पष्ट होते असेही बावनकुळे म्हणाले आहेत.