Latest Marathi News
Ganesh J GIF

विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मान्य, लोकसभेला चित्र बदलू

दक्षिण भारतात भाजपाला दारे बंद, कर्नाटकनंतर तेलंगणातही काँग्रेसचा दणदणीत विजय, मविआ व इंडिया आघाडी मजबूत

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून विजयी केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची अपार मेहनत व जनतेचा विश्वास यामुळेच काँग्रेसला तेलंगणात मोठे यश मिळाले आहे. कर्नाटकनंतर दक्षिण भारतातील दुसऱ्या महत्वाच्या राज्यात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे तर दक्षिण भारतातून भारतीय जनता पक्षाला जनतेने दारे बंद करून भाजपाच्या धर्मांध अजेंड्याला दक्षिण भारतात स्थान नाही हेच येथील जनतेने दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

विधानसभा निकालावर टिळक भवनमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, चार राज्यातील जनतेने दिलेला कौल काँग्रेस पक्षाला मान्य आहे. काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चारही राज्यात भरपूर मेहनत घेतली होती पण लोकशाहीत जनतेचा कौल सर्वोच्च असतो, तो आम्ही नम्रपणे मान्य करतो. या विधानसभा निवडणुकीत ज्या त्रुटी राहिल्या त्याचा अभ्यास करून लोकसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी करू. विधानसभेतील चित्र लोकसभेला राहत नाही, २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तिसगडमध्येही विजयी झाला होता व भाजपाचा मात्र पराभव झाला होता ते चित्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिसले नाही, त्याप्रमाणे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आजचे चित्र दिसणार नाही, त्यात बदल होईल व काँग्रेस पक्षाचा मोठा विजय होऊन केंद्रात सत्तेत येईल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष हिंदू-मुस्लीम या दोन धर्मात भांडणे लावून ध्रुवीकरणाचे राजकारण करत आहे, काही राज्यांमध्ये त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला. काँग्रेस अशा पद्धतीचे राजकारण करत नाही.

विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे सामाजिक न्यायाचे राज्य आहे. महाराष्ट्रात भाजपाचे विभाजनवादी राजकारण चालणार नाही, राज्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. महाविकास आघाडी राज्यात व देशपातळीवर इंडिया आघाडी मजबूत असून आगामी निवडणुकीत जनतेचा विश्वास संपादन करू, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!