एकदम ओक्के म्हणणाऱ्या शहाजीबापूंच्या मतदारसंघात नाॅट ओक्केचे चित्र
जनता म्हणते बापू भाषणं बंद करा काम करा, विरोधकांचीही टोलेबाजी
सांगोला दि ८(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणातील सत्तापरिवर्तन झाल्यानंतर सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील चांगलेच चर्चेत आले आहेत शहाजीबापूंच्या डायलॉगची चर्चा देशभरात होत असताना त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांच्या मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एकदम ओक्के म्हणणाऱ्या शहाजीबापूंच्या मतदारसंघातील लोक मात्र नाॅट ओके म्हणत असल्याचे चित्र आहे.
सांगोला तालुक्यातील दक्षिण भागातील जुजारपूर येथील ओढा दर पावसाळ्यात ओसंडून वाहतो. यामुळे शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी यांना पाण्यातून धोकादायक परिस्थितीत प्रवास करावा लागतो. यावर्षी देखील ओढ्याला पूर आला आहे. या ओढ्यावरील पूल जमीन पातळीवर असल्याने हा पूल पावसाळ्यात कायम पाण्याखाली असतो. यामुळे जुजारपूर जुनोनी या रस्त्यावरून धोकादायक पद्धतीने वाहतूक करावी लागते. यात पाटील वस्तीत जाणारा मार्गावर पुलचं नसल्याने प्रवाश्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो.या ठिकाणी उंच पूल बांधल्यास पावसाळ्याचे चार महिने या परिसरातील ग्रामस्थांची होणारी अडचण कायमची दूर होणार आहे. मात्र या परिस्थितीकडे आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. शिंदे गटाचा मित्र पक्ष भाजपाने देखील शहाजीबापूंच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
विरोधकांनी शहाजीबापूंना भाषणबाजी करण्यापेक्षा मतदारसंघातील प्रश्नांकडे लक्ष द्या असा खोचक सल्ला दिला आहे.विरोधकांच्या टीकेनंतर शहाजीबापू मतदार संघात लक्ष देणार की जनता त्रास सहन करत राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.