
सत्तेत असलेल्या भाजपाच्या ‘या’ आमदाराला पोलिसाची शिविगाळ
आॅडिओ क्लिप व्हायरल, आमदाराची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार म्हणाले आमदाराची इज्जत....
अकोला – राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आहे. मुख्यमंत्री भाजपा पक्षाचे आहेत. तरीही मागील काही दिवसापासून भाजपा पदाधिकाऱ्यांवर हल्ले आणि हत्येचे प्रसंग पहायला मिळाले आहेत. हे लोण आता आमदारांपर्यंत पोहोचले असून, एका भाजपा आमदाराला पोलिसाने शिविगाळ केली आहे.
भाजपचे मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांना फोनवर शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराने भाजप आमदाराला शिवीगाळ केली आहे. याची आॅडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. कत्तलीसाठी प्राण्यांना नेणाऱ्या वाहनाची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी परस्पर पैसे घेऊन वाहने सोडून दिल्याचा आरोप भाजप आमदार पिंपळे यांनी केला आहे. पिंपळे म्हणाले की, मी मूर्तिजापूर मतदारसंघातला भाजप आमदार आहे. माझ्या कार्यकर्त्याने कत्तलीसाठी गुरांची वाहतूक होत असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. त्यानंतर बार्शी टाकळी पोलिसांनी पैसे घेऊन ती वाहनं सोडून दिली. या घटनेनंतर पोलिसांना फोन केला तर त्या पोलीस अधिकाऱ्यांनी मलाच शिवीगाळ केली. पिंपळे यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. गृहखाते आपल्याकडे आहे, अशा शिवीगाळ करणाऱ्या ठाणेदारावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. कारवाई झाली नाही तर राजकीय आमदारांची यापुढे इज्जत राहणार नाही. त्यामुळे अशा ठाणेदारावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी कळकळीची विनंती, अपेक्षा भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी गृहमंत्र्यांना ऑडिओ क्लिप द्वारे केली आहे. पिंपळे यांना शिविगाळ करणारा पोलीस अधिकारी कोण आहे? याबाबत माहिती मिळू शकली नाही.
आमदार पिंपळे यांनी याआधीही गुरांची वाहतूक करणारी वाहणे पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली आहेत. त्यामुळे फडणवीस आता काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.