‘राज्यात सत्तांतर होताच तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सुटली’
शिंदे सरकारमधील 'या' मंत्र्याची जीभ पुन्हा घसरली, मराठा मोर्चा आक्रमक
उस्मानाबाद दि २६(प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणारे शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणासंदर्भात एक वादग्रस्त विधान केल्याबद्दल अडचणीत आले आहेत.त्याच्या वक्तव्याचा मराठा क्रांती मोर्चाने निषेध केला असुन माफी मागण्याची मागणी केली. उस्मानाबादमधील एका कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात बोलताना म्हणाले की, “आता मराठा समाजाकडून आम्हाला ओबीसी किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी केली जात आहे. या सगळ्यामागचा कर्ता करविता कोण आहे, हे तुम्हा-आम्हाला समजणे गरजेचे आहे. सगळ्यांना याबाबत माहिती आहे, पण कोणी बोलत नाही. दोनवेळा आरक्षण गेल्यानंतर मराठा समाज गप्प राहिला. पण आता राज्यात सत्तांतर होताच तुम्हाला लगेच मराठा आरक्षणाची खाज सुटली, असे वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला असून त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरवले होते. तेव्हापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. मध्यंतरीच्या काळात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक कायदेशीर प्रयत्न झाले. मात्र, या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. काही दिवसांपूर्वीच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्षपद सोपविण्यात आले आहे.
तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मराठा समाजात रोष निर्माण होण्याची भीती आहे. सावंत यांच्या या वक्तव्यावर मराठा आंदोलकांनी टीकेची झोड उठवली आहे. हा मुद्दा विरोधकांकडूनही तापवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावंत माफी मागणार की शिंदे सरकार वेगळ्या पद्धतीने हा विषय हाताळणार हे पहावे लागेल.