Latest Marathi News
Ganesh J GIF

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगेंना प्रकाश आंबेडकरांचा मोठा सल्ला

सरकारला दिलेली महिन्याभराची मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे यांनी पुढील दिशा स्पष्ट केली आहे. २० जुलैपासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात करणार असून, हे उपोषण अधिक कठोर असेल, असे स्पष्ट करत मराठा आणि ओबीसी समाजातील तणावास छगन भुजबळ कारणीभूत आहेत, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.तसेच आपल्या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना मोठा सल्ला दिला आहे.

काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने सगेसोयरे अध्यादेशाविरोधात भूमिका घेतली होती. संवैधानिक चौकट मोडणारा सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करा. सोयऱ्यांना आरक्षण ही मागणी असंवैधानिक / बेकायदेशीर आहे. सगेसोयरे यांना आरक्षण ही मागणी फक्त ओबीसी विरोधातील नाही, तर समस्त आरक्षणाच्या चौकटीला धक्का लावणारी आहे. या मागणीने आरक्षणाच्या मुख्य चौकटीलाच धोका निर्माण होतो, असे सांगत वंचित बहुजन आघाडीने याविरोधात एक ठराव केला. यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

मनोज जरांगे यांनी उपोषण करण्यापेक्षा २८८ जागा लढवल्या पाहिजे. त्यांनी निवडणूक लढवण्याबाबत भूमिका जाहीर केली होती. आता त्यांनी २८८ जागांवर विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. ते लढतील अशी माझी अपेक्षा आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. या मागणीसंदर्भात राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. अशा आशयाचे पत्र द्यायचे असे सर्वपक्षीय बैठकीत ठरले होते. ते पक्ष सर्वांनाच पाठवायचे आहे. मात्र, अद्याप तरी वंचित बहुजन पार्टीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पत्र आलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत खुलासा करावा आणि ते कधीपर्यंत पत्र पाठवणार आहेत हे सांगावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटलेली आहेत. तसेच महाविकास आघाडीमधील इतर पक्षाची मतेही फुटलेली आहेत. पाच मते काँग्रेसची फुटली आहेत आणि इतर दोघांची एक-एक मत फुटलेली आहेत. पण सात फुटलेल्या मतांचे खापर काँग्रेसवर फोडले जात आहे. काँग्रेसचे जे फुटलेले आमदार आहेत, त्यांच्यावर काँग्रेस काय कारवाई करणार? याचा खुलासा केला पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!