नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना प्रकाश आंबेडकरांचं खुलं आव्हान ; इतकंच संविधानावर प्रेम आहे तर मनुस्मृती जाळा
देशात लोकसभेच्या निवडणुकांमध्ये विरोधकांनी संविधान, घटना बदलण्याच्या मुद्याला चांगलीच हवा दिली. त्याचा फटका नरेंद्र मोदी सरकारला या निवडणुकीत बसला. 400 पारच्या नाऱ्याने त्यात भरीस भर घातली.त्यामुळे भाजपला मोठा फटका बसला. तर इंडिया आघाडीने हा मुद्दा इनकॅश करत मोठी मजल मारली. त्यात काँग्रेसने मोठं कमबॅक केलं. सत्ता स्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाची प्रत भाळी लावली. तर राहुल गांधी यांनी हे भाजपचं बेगडी प्रेम असल्याचा टोला लगावला. पण या सर्व मुद्यांवरुन प्रकाश आंबेडकर यांनी या दोन्ही नेत्यांना आता फैलावर घेतले आहे.
संविधानावर खरचं प्रेम असेल, तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी मनुस्मृती जाळा, असे आव्हान वंचित बहुजन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान आणि देशाच्या विरोधी पक्षनेत्याला केले आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे संविधानावर खरोखरच प्रेम असेल तर मी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना मनुस्मृतीच्या प्रती त्यांनी जाळाव्यात असे आव्हान त्यांनी केले. याविषयीचे ट्विट त्यांनी केले आहे.भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी संविधानावर वार केले आहेत. तसेच, वेळोवेळी उपेक्षित, वंचित जाती आणि समाजाचे शोषण केले आहे.बाबासाहेबांचे आदर्श आणि संविधानातील मूल्यांना काँग्रेस आणि भाजपने भ्रष्ट केले असल्याचेही ॲड.आंबेडकर म्हणाले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीने तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळवली. भाजपच्या नेतृत्वात यावेळी आघाडी सरकारचा प्रयोग सुरु आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. त्यांनी रालोओच्या पहिल्या बैठकीत संविधानाची प्रत माथी लावली. विरोधकांनी, इंडिया आघाडीने भाजप हा घटनेविरोधात असल्याचा दुष्प्रचार केल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचा भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे समोर आले. भाजपसहीत आघाडीतील अनेक नेत्यांनी इंडिया आघाडीच्या दुष्प्रचाराने जागा कमी मिळाल्याचे यापूर्वी पण सांगितले आहे. तर लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात राहुल गांधी यांनी संविधानासह अनेक मुद्यांवर सरकारविरोधात जोरदार फटकेबाजी केली होती. त्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरपूस समाचार घेतला होता. राहुल गांधी यांनी संविधानाला हात घातला ही मोठी थट्टा असल्याचा टोला मोदींनी लगावला होता.