
हुंड्यासाठी सतत छळ सासरच्यांनी केली गर्भवती विवाहितेची हत्या
लग्नात १५ तोळे सोने, ३५ लाखाचा खर्च तरीही पैशाची हाव संपेना, या मागणीसाठीचा जाच असह्य, शिल्पासोबत काय घडले?
बंगरुळू – हुंडा प्रथा अजूनही कित्येक संसार उद्ध्वस्त करत आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण चांगलेच गाजले होते. तरीही अश्या घटना सुरूच आहेत. आता कर्नाटकमधून अशीच एक घटना समोर आली आहे. एका २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर शिल्पा पंचांगमथ हिने हुंड्याच्या सततच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. महत्वाचे म्हणजे मृत्यूच्या वेळी ती दीड महिन्यांची गर्भवती होती आणि या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
इंजिनिअर असलेल्या शिल्पाचा विवाह ५ डिसेंबर २०२२ रोजी गंगावती तालुक्यातील वड्डरहट्टी येथील प्रवीणशी झाला होता. या विवाहासाठी शिल्पाच्या कुटुंबाने तब्बल ३५ लाख रुपये खर्च केला होता. याशिवाय प्रवीणला १५ तोळ्यांचे दागिने देखील देण्यात आले होते. प्रवीण लग्नाआधी एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत होता. पण लग्नानंतर त्याने नोकरी सोडून पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. यासाठी त्याने शिल्पाला माहेरहून ५ लाख आणण्यास सांगितले, त्यासाठी तो शिल्पाचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. ते दिल्यानंतरही छळ सुरूच होता. चार महिन्यांपूर्वी शिल्पाच्या बेबी शॉवरच्या चर्चेदरम्यान भांडण झाले होते. शिल्पाच्या आई-वडिलांनी सांगितलं की, शिल्पाचा नवरा प्रवीणचा दोन दिवसांपूर्वी फोन आलेला. त्याने सांगितलं की, तुमच्या मुलीला ह्दयविकाराचा झटका आलाय. लवकर निघून या. शिल्पाचे आई-वडिल आले, त्यावेळी त्यांना मुलगी सोफ्यावर मृतावस्थेत दिसली. त्याचं म्हणणं आहे की, त्यांच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही. प्रवीणने तिची हत्या केली व आत्महत्या केल्याचे सांगत आहेत. आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी शिल्पाच्या माहेरच्या कुटुंबियांनी केली आहे. शिल्पाला दोन वर्षांचा मुलगा असून त्याचा ताबा देण्याची मागणी शिल्पाच्या आईने केली आहे.
आई-वडिलांची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली आहे. आत्महत्येच्या ठिकाणी कोणतीही चिठ्ठी पोलिसांना मिळालेली नाही. आरोपी प्रवीणला ताब्यात घेऊन चौकशी सुरु आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा हुंडा प्रथा समाजासमोर आली आहे.