मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आणि सगेसोयऱ्यांचे आरक्षण लागू व्हावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. येत्या 6 जुलैपासून मराठवाड्यातील हिंगोलीतून त्यांच्या मराठा महाएल्गार संवाद रॅलीची सुरुवात होणार आहे.मराठवाड्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये मनोज जरांगे पाटील हे सभा घेऊन पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रान पेटवणार आहेत. त्यादृष्टीने हिंगोलीतील महाएल्गार संवाद रॅली अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
हिंगोलीत मनोज जरांगे यांच्या या संवाद रॅलीची जोरदार तयारी सुरु आहे. या संवाद रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज बांधव हिंगोली शहरात दाखल होणार आहेत. मुख्य शहरात सर्व ठिकाणी तब्बल 200 भोंगे लावले जाणार आहेत. शहरातील प्रत्येक चौकात आणि मोक्याच्या ठिकाणी हे भोंगे लावण्याचे काम आता सुरू करण्यात आले असून संवाद रॅलीसाठी आलेल्या मराठा समाज बांधवांना सर्व सूचना आणि मनोज जरांगे यांचं भाषण चांगल्या पद्धतीने ऐकता यावे, यासाठी ही तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळते.
हिंगोलीतील मराठा महाएल्गार संवाद रॅलीसाठी गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलकांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या होत्या. 6 जुलैच्या रॅलीसाठी जास्तीत जास्त मराठा बांधव उपस्थित राहतील, यादृष्टीने जनजागृती करण्यात आली होती. मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली होणाऱ्या मराठा महाएल्गार संवाद रॅलीमध्ये जवळपास दोन लाख मराठा बांधव उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला सगेसोयऱ्यांचे आरक्षण देण्यासाठी 13 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. त्याची आठवण करण्यासाठी जरांगे यांच्याकडून महाएल्गार संवाद रॅली काढली जात आहे.