
तुझ्या कपड्याला आणि बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले
भाजपा आमदाराची मतदारांना धमकी, संतप्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल, लीड न दिल्याने काम करणार नसल्याचीही धमकी
जालना – भाजपा नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. आता या वाचाळवीरांच्या यादीत आणखी एका नेत्याची भर पडली आहे. भाजपाचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे भाजपा अडचणीत आला आहे. तसेच लोणीकर यांना टीकेचा सामना करावा लागत आहे.
बबनराव लोणीकर एका कार्यक्रमात त्यांच्या टीकाकारांना उत्तर देताना अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरत हिनवले आहे. बबनराव लोणीकर यांनी एका गावात टीका करणाऱ्या काही युवकांवर टीका करताना अत्यंत संतप्त भाषेत भाष्य केलं. “तुझ्या बापाला पेरणीसाठी पैसे मोदींनी दिले… तुझ्या मायच्या नावावर लाडकी बहिण योजनेचे पैसे आले… तुझ्या अंगावरचे कपडे, पायातील चप्पल, हातातलं डबडं हे सगळं आमच्या सरकारमुळेच आहे”, असे विधान केले. याशिवाय, त्यांनी उपस्थित युवकांना उद्देशून “आमचेच पैसे घेतो आणि आम्हालाच तंगड्या वर करतो?” असा प्रश्न करत त्यांच्यावरच शिवराळ भाषेत टिका केली. त्यांच्या या अशोभनीय भाषेला सध्या सोशल मीडियावर तीव्र विरोध होत आहे. जालना तालुक्यातील बोरगावमध्ये लोणीकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या आठ कोटीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच उद्घाटन झाले. यावेळी भाषणात लोणीकरांनी गावकऱ्यानां हा इशारा दिला आहे. विधानसभेत लीड नसल्याने नाराज बबनराव लोणीकर यांनी याआधीही नाराजी व्यक्त केली होती. “पाच वर्षांमध्ये कमळाचं एक बटन दाबायचं तेही केलं नाही. मी गावाला ८ कोटींचा सिमेंट रोड दिला. मला मत द्या किंवा नका देऊ. मी दोन-तीन वेळेस चव पाहणार, नाहीतर गावावर फुली मारणार.”असा इशारा दिला होता. लोणीकर यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टिका करत माशीची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकारावर अद्याप भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचं वक्तव्य पक्षाला अडचणीत आणू शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय भाषेतील सुसंस्कृततेचा वारंवार उच्चार करणाऱ्या भाजप नेत्यांकडूनच अशा प्रकारचे वक्तव्य आलं असल्यामुळे सर्वच स्तरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शेतकरीविरोधी मानसिकता, अहंकार आणि सत्तेतून आलेली मस्ती यातूनच असे वक्तव्य होत असल्याची टिका होत आहे. आता यावर भाजप काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.