
कर्नाटक १४ (प्रतिनिधी) – कर्नाटकातील कौटुंबिक न्यायालयात एका व्यक्तीने चाकूने गळा चिरून पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर समुपदेशन सत्रात त्यांनी विचार बदलत एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. पत्नीची हत्या केल्यानंतर पळून जाताना आरोपी पतीला नागरिकांनी पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत चित्रा हिचा विवाह पाच वर्षांपूर्वी शिवकुमार बरोबर झाला होता.पण पतीच्या त्रासाला कंटाळून चित्राने दोन वर्षांपूर्वी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आज न्यायालयात तासाभराच्या समुपदेशनानंतर ते एकत्र राहण्यासाठी तयार झाले होते.पण न्यायालयाच्या बाहेर येताच शिवकुमारने चाकूने गळा चिरत चित्राची हत्या केली, तिला तो रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना तिथल्या नागरिकांनी त्याला पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी शिवकुमारला अटक करत त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तो चाकू घेऊन न्यायालयात कसा घुसला याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. आरोपींनी ज्या शस्त्राने गुन्हा केला आहे ते शस्त्र जप्त करण्यात आले आहे. पण या घटनेमुळे त्यांची दोन मूल पोरकी झाली आहेत.