
वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर सोलापूरातही मालमत्ता
विष्णू चाटेच्या बहिणीच्या नावेही संपत्ती? ज्योती जाधव कराडपेक्षाही श्रीमंत, बघा किती आहे संपत्ती?
बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि अवदा कंपनीच्या खंडणी प्रकरणात मोका लागलेला खंडणीखोर मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा वाढतच चालला आहे. त्याची दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावे संपत्तीचे मोठेमोठे आकडे समोर येत आहेत. त्यामुळे कराडच्या नावे इतके घबाड आले कोठून असा सवाल उपस्थित होत आहे.
वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर कोट्यवधींच्या मालमत्तेचा खुलासा झाला आहे. पुण्यातील हडपसर आणि खराडी भागात तीन फ्लॅट्स असल्याची माहिती मिळाली आहे.याशिवाय, फर्ग्युसन महाविद्यालयाजवळ नव्या इमारतीत दोन महागडे ऑफिस स्पेस खरेदी केल्याचेही समोर आले होते. आता तिच्या नावे सोलापूर जिल्ह्यातही मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बार्शीमध्ये तब्बल ३५ एकर जमीन वाल्मीक कराडच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. अंदाजे मूल्य सुमारे दीड कोटी रुपयांच्या घरात आहे. बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधवच्या नावे चार जमिनीचा सातबारा आहे. या संदर्भातील ट्विट अंजली दमानिया यांनी केले आहे. त्याचबरोबर या ज्योती जाधवला वाल्मिक कराडपासून दोन मुलं देखील असून त्यांच्या नावे देखील काही संपत्ती खरेदी केल्याचं समोर आलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्योती जाधव यांची चौकशी करण्यात आली असून, हत्येच्या काळात वाल्मिक कराड त्यांच्या घरी होता, अशी माहितीही समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी ज्योती जाधव यांची चौकशी केली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या पत्नीच्या नावावरची कोट्यवधींची संपत्ती ईडी ताब्यात घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुण्यात एफसीरोडला सात शॉप आकाने बुक केले आहेत. एका शॉपची किंमत पाच कोटी रुपये आहे. त्या शॉपचे नंबर ६०१ ते ६०७ अशी आहेत. ६०८ वं शॉप विष्णू चाटे यांची बहीण सोनवणे यांच्या नावावर आहे, असा दावा धस यांनी केला आहे.