
जाब विचारत तरुणांची सरपंचाला बेदम मारहाण
मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, राज्यातील सरपंच असुरक्षित?
लातूर – बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण राज्यात गाजत आहे. त्यानंतर सरपंचांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. त्यातच आता लातूर जिल्ह्यात सरपंचाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा याची चर्चा जोर धरू लागली आहे.
लातूरच्या निलंगा तालुक्यातल्या शेडोळवाडी येथे ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना सरपंच आणि गावातील दोन तरुणांमध्ये वाद झाला होता. याप्रकरणी सरपंच शेख रुबाब आणि ग्रामसेवक पाटील एन. एस. यांनी निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ग्रामपंचायतीने घरासमोर महावितरणाचे पोल उभे केले. तसेच उभे करण्यात आलेल्या पोलमध्ये करंट उतरला आहे, अशी तरुणांचा तक्रार होती. सरपंच यांनी तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सरपंचांनी सुरुवातीला सांगितलं की हा महावितरण विभागाचा प्रश्न आहे मी महावितरणच्या लाईनमनला फोन करून या सर्व घटनेची माहिती देतो असं सांगितले. मात्र संपातलेल्या तरुणांनी मात्र सरपंचाला अरेरावीची भाषा वापरत शिवीगाळ केली. सरपंचाला ग्रामपंचायत कार्यालयामध्येच जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच ग्रामपंचायत मध्ये घुसून संगणक, वायफाय आणि इतर साहित्याची तोडफोड करत शासकीय कामात अडथळा आणल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आहे. पोलिस गुन्हा दाखल करण्यात चालढकल करत असल्याचा आरोप सरपंच शेख रुबाब यांनी केला आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गावातीलच वाजीद पठाण, बाशीर पठाण, महबूब पठाण यांनी सरपंचाला मारहाण केली आहे.
मारहाण करणाऱ्या तरुणांवर योग्य ती कारवाई करून मला न्याय द्यावा, अशीच मागणी या सरपंचांनी केली आहे. पण राज्याभरात सरपंचावर होणाऱ्या हल्ल्यात वाढ झाली आहे.