
हाॅर्न वाजवल्यामुळे पुण्यात कुटुंबाला बेदम मारहाण
महिलांनाही लाथाबुक्क्याने मारहाण, डोळाही फोडला, पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे
पुणे – पुण्यातील मुंढवा परिसरात एक धक्कादायक घटना उघडली आहे. इथे दोन जणांनी एका कुटुंबाला जबर मारहाण केली आहे. केवळ हाॅर्न वाजवल्याच्या कारणवरून ही मारहाण करण्यात आली आहे. यावेळी महिलांनाही मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
राजेश नाथोबा वाघचौरे, सुवर्णा राजेश वाघचौरे, संस्कृती राजेश वाघचौरे अशी जखमींची नावे आहेत. शुभम गायकवाड व त्याचे वडील राजू गायकवाड नावाच्या तरूणांविरुद्ध त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी म्हणजे ९ तारखेला तक्रारदार राजेश वाकचौरे आपल्या पत्नी सुवर्णा वाकचौरे आणि मुलगी संकृती यांच्यासह बाहेर जात होते. यावेळी मुंढवा येथील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ हॉर्न वाजवल्यामुळे त्यांचे आणि आरोपी गायकवाड यांच्याबरोबर वाद झाला. त्यामुळे हल्लेखोरांनी वाघचौरे परिवारावर हल्ला केला. त्यांनी राजेश वाघचौरे यांना फायटरने मारहाण केली आणि त्यांच्या पत्नी व मुलीला देखील जखमी केले. तसेच राजेश यांना वाचवण्यासाठी आलेली मुलगी संस्कृती आणि त्यांची पत्नी सुवर्णा यांना देखील बेदम मारहाण केली. त्यानंतर वाघचौरे यांच्या गाडीवर मोठा दगड मारून काच फोडण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी राजू गायकवाड आणि शुभम गायकवाड यांना तात्काळ अटक केली आहे. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेने पुणे पोलिसांपुढे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे केले आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या घटनेचा पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.