पुणेकरांनो! उद्या पुण्यात वाहतुकीसाठी हे रस्ते राहणार बंद
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे पुण्यातील वाहतुकीत बदल, बदल पाहून बाहेर पडा
पुणे दि ३१(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजे १ आॅगस्टला पुण्यात येणार आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधानांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतर प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे उद्या अनेक नेतेमंडळी पुण्यात येणार आहेत. पण त्यामुळे उद्या पुण्यातील वाहतूकीत आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीतले बदल पाहुन बाहेर पडणे गरजेचे आहे.
सुरक्षिततेच्या कारणास्तव पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. सकाळी सहा ते दुपारी तीनवाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात काही रस्ते बंद राहणार आहेत. मोदींच्या दौऱ्यानिमित्त उद्या सकाळी सहा वाजल्यापासून पुणे शहराच्या मध्यभागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. उद्या पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड या ठिकाणांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जेधे चौकातून सारसबागेकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावर जाण्यासाठी जेधे चौकातून सातारा रोड, मित्रमंडळ चौक, सावरकर चौक मार्गे सिंहगड रस्ता या मार्गाचा वापर करण्याचं अवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आलं आहे. सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटला जाण्यासाठी सावरकर चौक, मित्रमंडळ चौक, व्होल्गा चौक, जेधे चौक या मार्गाचा वापर करण्याचं अवाहन करण्यात आलं आहे. जेधे चौकातील फ्लायओव्हरवरून सारसबागेकडे जाण्यास प्रवाशांना बंदी घालण्यात आली आहे.
टिळक रस्त्याने एस. पी. कॉलेज चौकात आल्यानंतर ना. सी. फडके चौकाकडे जाण्यासाठी उजवीकडे जाणारा मार्ग खुला करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना या मार्गाचा वापर करता येणार आहे. पुणे पोलीसांनी तसे पत्रक काढून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.