पुणेकरांनो २८ नोव्हेंबरपासून वाट पाहणार नाही रिक्षावाला!
पुणेकरांसाठी मोठी बातमी, प्रवाशांचे होणार हाल, एकदा वाचा
पुणे दि २३(प्रतिनिधी) – पुणेकरांचे २८ तारखेपासून हाल होण्याची शक्यता आहे. कारण पुण्यातील रिक्षा चालकांनी आपली रिक्षा रस्त्यावर न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ओला, उबेर, रॅपिडो कंपनीकडून ॲपद्वारे बेकायदेशीर टू व्हीलरवर होणारी प्रवासी वाहतूक थांबवावी यासाठी पुण्यातील रिक्षा संघटना आक्रमक झालेल्या असून २८ नोव्हेंबरपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बेमुदत बंदचा इशारा पुण्यातील १२ रिक्षा संघटनांनी दिला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये सव्वा लाख रिक्षा चालक व्यावसायिक आहेत त्यातले ५० ते ६० हजार रिक्षा चालक २८ तारखेपासून बंद मध्ये सहभागी होणार आहेत. याआधीही रिक्षा चालकांनी फेब्रुवारीमध्ये बंदची हाक दिली होती. आपल्या संपाबद्दल माहिती देताना रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी सांगितले की, पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरात बेकायदा बाईक टॅक्सीची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या सर्व बेकायदा व्यावसायिकांमुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येत असून कायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्या जवळपास सव्वा लाख रिक्षा चालकांचे परिवार रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता बंदचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आरटीओ कार्यालयासमोर बेमुदत चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान आपत्कालीन परिस्थितीसाठी ५० रिक्षा तयार ठेवण्यात येणार आहेत अशीही माहिती रिक्षा संघटनेतर्फे देण्यात आली आहे.
पुण्यात पीएमटीनंतर सर्वाधिक नागरिक प्रवासासाठी रिक्षाचा वापर करतात. त्यामुळे रिक्षा चालकांनी संप केल्यास प्रवाशांचे हाल होणार आहेत. विविध राजकीय पक्षाच्या संघटना सुद्धा यात सहभागी होणार असून १ लाख २० हजार कुटुंब यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती या संघटनांनी दिली आहे. त्यामुळे सोमवारी प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.