
वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी राजेंद्र आणि सुशील हगवणेंना अटक*
स्वारगेट परिसरातून केली अटक, वैष्णवीच्या मृत्यूनंतर नरधमांची बाप लेकाची मटनपार्टी, व्हिडीओ व्हायरल
पुणे – पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांचे मृत्यू प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. वैष्णवी संशयास्पद मृत्यू प्रकरणात फरार असलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना आज पहाटे अटक झाली आहे. स्वारगेट परिसरातून त्यांना अटक करण्यात आली आहे.
वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अखेर पिंपरी -चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणेला स्वारगेट मधून अटक केली आहे. सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. पोलिसांची तब्बल सहा पथक आरोपींचा शोध घेत होते. या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण तापले होते. अखेर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.आज पहाटे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे हिने १६ मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी याआधीच अटक करण्यात आली होती. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे गेल्या ७ दिवसांपासून फरार होते. अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे राजेंद्र व सुशील हगवणे हे अटक होण्यापूर्वी एका हॉटेलमध्ये आरामात मटण खात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. वैष्णवी प्रकरणामुळे एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असताना राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशिल हगवणे हॉटेलमध्ये बसून मटण पार्टी करत असल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान कस्पटे कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन निलेश चव्हाणच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याबद्दल आणि पिस्तुलाच्या सहाय्याने दहशत निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र हगवणे यांची मोठी सून देखील कौटुंबिक अत्याचाराची बळी ठरली आहे. तिने देखील हगवणे कुटुंबाकडून त्रास दिला जात असल्याची माहिती दिली आहे. तिने देखील यापूर्वी अनेकदा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र राजकीय दबावाखाली पोलिस हगवणेंवर कारवाई करत नसल्याचा दावा तिने केला होता.