या लावणीसम्राज्ञीचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम?
नवी वाट चोखाळत या पक्षात केला प्रवेश, या मतदारसंघातून लढवणार विधानसभा निवडणूक?
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील राजकारण तेलगांणातील भारत राष्ट्र पक्ष नावाचा पक्ष सक्रिय झाल्यापासून अनेकांनी त्यांचा झेंडा हाती घेतला आहे. पण विविध पक्षातील नेतेमंडळी गळी लागल्यानंतर आता बीआरएसने आपला मोर्चा कलावंताकडे वळवला आहे. पण आता त्याला पुन्हा यश येताना दिसत असुन लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला आहे.
आपल्या लावणीच्या जीवावर लाखोंना घायाळ करणाऱ्या आणि लावणीला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सुरेखा पुणेकर यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या धुमधडाक्यात प्रवेश केला होता. पण आता दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हैदराबाद येथील भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.राव यांच्या बीआरएस पक्षात सुरेखा यांनी प्रवेश केला आहे. पुणेकर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेक दिवसापासून इच्छुक आहेत. त्यामुळेच त्यांनी बीआरएसमध्ये पक्षप्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. त्या मोहोळ किंवा देगूलूर या दोन मतदारसंघातून बीआरएसच्या तिकिटावर लढण्याची शक्यता आहे. याआधी त्यांनी अनेकवेळा मोहोळ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता बीआरएस त्यांना संधी देणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून जाहिराती केल्या जात आहेत. विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून याआधी प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीला रामराम केला होता. पण त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. पण सुरेखा पुणेकर यांनी मात्र वेगळा मार्ग निवडत बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. सुरेखा पुणेकर यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.