
रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला धक्का शिंदे गटात करणार प्रवेश
पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा, काँग्रेसला खिंडार, म्हणाले सगळे मिळाले पण सत्तेमुळे....
पुणे – महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला दणका बसला असून पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.गेल्या काही दिवसांपासून रविंद्र धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसापुर्वी एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची भेट घेतली होती. अखेर या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं आहे. काँग्रेस सोडताना दुःख होत असल्याची भावना रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केली आहे. रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं की, ‘पक्ष सोडताना दुःख होत आहे. सत्ता असल्याशिवाय काम होत नाहीत. काँग्रेस पक्षावर कसलीच नाराजी नसून कोणत्याही नेत्यांवरही नाराजी नाही. काँग्रेसने भरपूर दिलं. मात्र कार्यकर्त्यांच्या भावनाही समजून घेतल्या पाहिजेत. एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांना भेटलो होतो. कार्यकर्त्यांसोबत देखील चर्चा केली आहे. एकनाथ शिंदे यांची आज भेट घेणार असून त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार आहे, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडे मी काहीही मागितलेलं नाही. मात्र सत्तेशिवाय कामं होतं नाहीत असं जनतेचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदेंसोबत काम करायला हरकत नाही, अशी मानसिकता झाली आहे. गेल्या ३५ वर्षात मला सत्तेचा लाभ मिळाला नाही. कार्यकर्त्यांची आता सत्तेसह जाण्याची भावना आहे, असंही धंगेकर यांनी म्हटलं. महापालिका निवडणूक मला लढवायची नाही, हे देखील रविंद्र धंगेकर यांनी स्पष्ट केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर धंगेकर यांनी काँग्रेसचा हात सोडल्याने पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेसने धंगेकर यांना पुण्यातून लोकसभेचं तिकीट दिले होते. पण त्यांना भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कसब्यातून धंगेकरांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली होती. पण विधानसभा पोटनिवडणूकीसारखा चमत्कार यंदा होऊ शकला नाही आणि हेमंत रासने यांनी धंगेकरांचा पराभव करत कसबा परत भाजपाकडे आणला होता.