
मुलीने काढलेल्या चित्रामुळे आईच्या खुनाला फुटली वाचा
त्या विवाहितेच्या हत्येचे गुढ उकळले, सासरच्यांनी हत्या करत रचला आत्महत्येचा बनाव
झाशी – मुलीच्या एका चित्रामुळे आईच्या खुनाला वाचा फुटल्याची घटना झासीमध्ये समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील झाशी येथे एका विवाहितेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. सुरूवातीला आत्महत्या वाटणारे प्रकरण मयत महिलेच्या चार वर्षाच्या मुलीने चित्र काढल्याने खून की आत्महत्या हे गूढ उकलण्यास मदत झाली आहे.
झाशीच्या कोतवाली परिसरात पंचवटी शिव परिवार कॉलनीत राहणाऱ्या सोनाली बुधोलिया ही महिला सोमवारी मृतावस्थेत आढळली होती. यानंतर सासरच्यांनी तिने आत्महत्या केल्याचा दावा केला होता. मिळालेल्या माहितीनुसार सोनालीचे २०१९ साली संदिपबरोबर लग्न झाले होते. लग्नात संदिपच्या घरच्यांना 20 लाख रोकड हुंडा म्हणून दिली होती. मात्र तरीही लग्नानंतर त्यांची मागणी वाढू लागली. माहेरुन कार आणण्यासाठी ते सोनालीला छळत होते. अखेर सोनालीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर तडजोड करण्यात आली होती. सासरच्या लोकांना मुलगा हवा होता, मात्र सोनालीला मुलगी झाली. त्यामुळे तिचा छळ सुरुच होता. घटनेच्या दिवशी सोनाली झांशीला तिच्या नातेवाईकाच्या लग्नाला गेली असता पतीने तिला कॉल करून घरी बोलावले. त्यानंतर सोमवारी तिच्या वडिलांना फोन करून तिची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळाने पुन्हा फोन करून तिने आत्महत्या केल्याचे सांगितले. पण याप्रकरणी कोतवाली पोलिसात सोनालीच्या पालकांनी तिची हत्या केल्याबाबत फिर्याद दाखल केली होती. पोलीसांनी चाैकशी सुरु केली असता, पाच वर्षांच्या मुलीने वहीत रेखाटलेले एक चित्र महत्त्वाचा पुरावा ठरले असून यातून सदर खुनाचा उलगडा झाला. तिने चित्र काढत सांगितले की, बाबा आईला नेहमी मारत असत. तू मरत का नाहीस? असेही ते विचारायचे. बाबांनीच आईचे शरीर दोरीला लटकविले आणि नंतर त्यावर दगड मारला. त्यानंतर तिला पुन्हा खाली उतरवून गोणीत भरले. वडिलांनी मलाही मारण्याची धमकी दिली होती. असेही त्या चिमुकलीने पोलिसांना सांगितले.
कोतवाली शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी रामवीर सिंह म्हणाले की, आम्ही महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तापसणीसाठी पाठवला आहे. मुलीच्या पालकांनी खुनाच संशय व्यक्त केला आहे. त्याप्रमाणे आम्ही सासरच्या कुटुंबियांना ताब्यात घेतले आहे.