रडणारे, पळणारे, घाबरणारे, त्यांच्यासोबत गेले. आपल्या बरोबर राहिलेले लढणारे सामान्य लोक आहेत अशा शब्दात आमदार रोहित पवारांनीअजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांवर निशाणा साधला.इंदापूर येथे पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. याठिकाणी अप्पासाहेब जगदाळे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश पार पडला.
यावेळी रोहित पवार म्हणाले की, भाजपाने अचानक इथेनोलचा निर्णय घेतला. त्यामुळे ऊस उत्पादकांचे ३०० रुपयांचे नुकसान झाले. द्राक्ष उत्पादक अडचणीत आला. भाजपा समाजासमाजामध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करत आहे. आज आपल्याकडे पक्षप्रवेश होत आहेत. हा ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है..वस्ताद हा शेवटचा डाव राखून ठेवतो, तोच आज इथला डाव आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच या भागात एमआयडीसी शरद पवारांमुळे आली. भाजपाने एकालासुद्धा नोकरी दिली नाही. आता ते युनियनच्या लोकांना धमक्या देत आहेत. याठिकाणी जो काही निधी आला त्यातील ४० टक्के मलिदा हा मलिदा गँगच्या घरामध्ये गेला आहे. ६००० रुपयांमध्ये शेतकऱ्याचे मत भाजपाने विकत घेतलंय. म्हणजे ४ रुपये दिवसाला देतेय आणि भाजपा म्हणते, शेतकरी आम्हाला मतदान करणार असंही रोहित पवारांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं.
भाजपाच्या एकाही खासदाराने संसदेत मराठा, धनगर आरक्षणाचा मुद्दा मांडला नाही. धनगर, लिंगायत, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सुप्रिया सुळे सातत्याने संसदेत मांडतायेत. दडपशाहीच्या माध्यमातून बूथ ताब्यात घेऊ असं सत्तेतले लोक म्हणतात. मात्र सुप्रियाताईंची यावेळी लीड साडे तीन लाखावरून साडे चार लाखांपर्यंत असेल असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.