ऑनलाईन गेमसाठी सेल्समनने केली चोरी ; शोरूममधून तब्बल ७ लाखांचे दागिने केले लंपास, काय आहे संपूर्ण प्रकरण?
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील एका ज्वेलरी शोरूममध्ये काम करणाऱ्या सेल्समनला ऑनलाईन गेमचं इतकं व्यसन लागलं की, त्याने शोरूममधून तब्बल सात लाखांचे दागिने चोरून नेले. यानंतर, त्याने ते दागिने गहाण ठेवले आणि ऑनलाईन गेम खेळला. पोलिसांनी आरोपीला अटक करून हा प्रकार उघडकीस आणला आहे. याआधीही आरोपीने शोरूममधून दागिने चोरल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
२६ सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत आरोपी सेल्समन प्रदीप डोंगरे शोरूममधून घरी न आल्याने त्याच्या पत्नीने पोलीस ठाणे गाठून तो हरवल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी शोरूमचालकाकडे चौकशी केली असता सेल्समन प्रदीप डोंगरे हा आज शोरूममध्ये आला नसल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता प्रदीप डोंगरे याच्याकडे जबाबदारी असलेल्या दागिन्यांची मोजणी केली असता त्यामध्ये कमी सोन्याच्या बांगड्या, नाणी व पेंडंट आढळून आले. पोलिसांनी सायबर टीमच्या मदतीने आरोपीचं ठिकाण शोधून ३० सप्टेंबर रोजी देव पार्क येथून त्याला पकडलं. ऑनलाईन गेममुळे शोरूममधील दागिने चोरून खासगी कर्ज कंपनीत गहाण ठेवून हा गेम खेळल्याची कबुली आरोपी तरुणाने चौकशीदरम्यान दिली. यानंतर पोलिसांनी सर्व सामान जप्त करून आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाला गेल्या दीड महिन्यापासून ऑनलाईन गेमिंगचं व्यसन होतं. व्यसनाधीन झाल्यानंतर काही दिवसांनी थोडा नफा मिळाल्यावर अधिक कमाई करण्यासाठी त्याने शोरूममधून दागिने चोरले आणि ते गहाण ठेवून पैसे घेतले. यानंतर त्याला नफा मिळाल्यावर त्याने गहाण ठेवलेले दागिने परत मिळवून दिले. पुन्हा ऑनलाईन गेमच्या व्यसनामुळे त्याचे पैसे बुडू लागले, त्यानंतर त्याने शोरूममधून चोरी करून दागिने लंपास करण्यास सुरुवात केली. पोलीस अधीक्षक एसपी मनीष खत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून पाच सोन्याच्या बांगड्या, दोन सोन्याच्या चेन, एक सोन्याची अंगठी, एक सोन्याचे पेंडेंट, एक सोन्याचं नाणं जप्त करण्यात आलं आहे.