Latest Marathi News
Ganesh J GIF

अमित शाहावर संजय राऊत यांची खोचक टीका

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे तीन टप्पे पार पडले असून चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगत आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावरून विरोधकांच्या इंडिया आघाडीवर केलेल्या टीकेनंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे.अमित शाह हे इंडिया आघाडीमध्ये येणार असतील तर आम्ही त्यांना पंतप्रधान करतो, असं राऊत यांनी म्हटलं आहे.इंडिया आघाडीवर टीका करताना अमित शाह यांनी जालना येथील सभेत म्हटलं होतं की, “एकीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली १२ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणारी इंडिया आघाडी आहे. तर दुसरीकडे २३ वर्षांपासून एकही सुट्टी न घेता भारतमातेची सेवा करणारे नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्यावर २५ पैशांच्या भ्रष्टाचाराचा आरोप कोणी लावू शकत नाही. आमच्याकडे नेता, नीती आणि पुढील २५ वर्षांतील देशाच्या विकासाचा कार्यक्रम तयार आहे. विरोधकांकडे ना नेता आहे, ना नीती आहे,” असा हल्लाबोल अमित शाह यांनी केला होता.

अमित शाह यांच्या वक्तव्याचा संजय राऊत यांनी खोचक शब्दांत समाचार घेतला. पत्रकारांनी अमित शाह यांच्या वक्तव्याविषयी प्रश्न विचारताच संजय राऊत म्हणाले, “मग काय करायचं? अमित शाह येत आहेत का इंडिया आघाडीमध्ये? आम्ही त्यांना पंतप्रधान करतो. तुमचा चेहरा बघा आधी, थकला आहे आता. आजारी पडला आहे. रोज खोटं बोललं जात आहे. आमचं आम्ही बघू, तुम्ही आमची चिंता करू नका,” असा पलटवार राऊत यांनी केला आहे.संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “नरेंद्र मोदी यांचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलं आहे. भारतीय जनता पक्षानं एक पक्ष म्हणून जबाबदारीनं आपल्या या लाडक्या नेत्यावर उपचार करणं गरजेचं आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा ठेवलेली नाही. दहा वर्षे जी व्यक्ती पंतप्रधानपदावर बसलेली आहे. नेतृत्व करत आहे. जे तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांनी देशाचं भवितव्य, देशाचा विकास, या विषयावर आपल्या भूमिका मांडल्या पाहिजेत. मला तिसऱ्यांदा का निवडून द्यायला पाहिजे, यासाठी माझ्याकडे ही ब्लू प्रिंट आहे, असं सांगितलं पाहिजे. मी दहा वर्षांत ही कामं केली आहेत, हे सांगितलं पाहिजे. मात्र मोदींनी एकाही प्रचारसभेत अशी भूमिका मांडल्याचं दिसलं नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!