
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीप्रमाणे महाविकास आघडीमध्येही जागावाटाचा गोंधळ सुरु आहे मात्र असे असले तरी जागावाटप जवळपास पूर्ण झालंय. पण सांगली या एका जागेमुळे मविआतील घटकपक्षांत नाराजी आहे.या जागेबाबतचा तिढा सोडवण्यासाठी अनेक बैठका झाल्या पण तोडगा मात्र निघाला नाही. या सगळ्या गोंधळात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अचानक भाजपच्या माजी आमदारी भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
भाजपचे सांगलीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करणारे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांची संजय राऊत यांनी भेट घेतली आहे. त्यासाठी राऊत थेट जतमध्ये गेले होते. विलासराव जगताप हे भाजपचे माजी आमदार आहेत. त्यांनी संजयकाका पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. असे असतानाच संजय राऊत यांनी विलासराव यांची भेट घेतली आहे.
या दोन्ही नेत्यांची बैठक कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतीलच राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांच्याकडून विरोध होत आहे. चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करताना आम्हाला विश्वासात घेण्यात आलेलं नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. खासदार शरद पवार यांनीदेखील काँग्रेसप्रमाणेच मत व्यक्त केले आहे. काहीही झाले तरी आम्ही ही जागा सोडणार नाही,असंही काँग्रेसचं म्हणणं आहे. सहकारी पक्षांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेची चांगलीच पंचाईत झाली आहे.