भीतीदायक! बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार
आधी गाडी फोटली, आता गोळीबार, गोळीबार सीसीटीव्हीत कैद, पोलिसांना वेगळाच संशय?
नाशिक – नाशिकच्या दिंडोरी रोड वरील बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार आणि दगडफेक करण्यात आला आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार आणि दगडफेक करून तिथून पळ काढलेला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
नाशिकच्या म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या दिंडोरी रस्त्यावर एका नामवंत बिल्डरचं घर आहे. शुक्रवारी पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांनी त्यांच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार आणि दगडफेक केली आहे. गोळीबारानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. या हल्ल्यात कोणाला काहीही इजा झालेली नाही. मात्र भल्या पहाटे अशाप्रकारे गोळीबार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. या गोळीबाराचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसापुर्वी संबंधित बिल्डरच्या घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. तोडफोड केल्याची घटना ताजी असताना आता घरावर गोळीबार करण्यात आला आहे. आता हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, याची माहिती अद्याप समोर आली नाही. खंडणी किंवा धमकावण्याच्या हेतूने हा गोळीबार केला असावा असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गोळीबार प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा तपास करत आहेत.