
धक्कादायक! पुण्यात दुचाकीस्वाराने पोलिसाच्या डोक्यात घातला दगड
पुण्यात पोलीसच असुरक्षित! वर्दीचा धाक संपला? हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, आरोपी फरार
पुणे – मागील काही दिवसांपासून राज्यात पोलिसांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. आता पुण्यातूनही असाच प्रकार उघडकीस आला आहे. भेकराईत बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावरच प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक गंभीर जखमी झाले आहेत. फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात ही घटना घडली. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक हे गुरुवारी सायंकाळी ते भेकराईनगर चौकात वाहतूक नियमन करत होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती फोनवर बोलत दुचाकी चालवत होता. नाईक यांनी त्याला गाडी चालवताना फोनवर बोलू नकोस असे सांगितले. याचा राग आल्याने त्यांनी नाईक यांना शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात राजेश नाईक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अज्ञात दुचाकी चालकाविरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे रामटेकडी येथे कोयता गँगच्या गुंडांना अटक करण्यासाठी पोलीस गेले असता, त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला. निहाल सिंग नावाच्या आरोपीने केलेल्या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पुण्यात पोलीसच सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.
दुचाकी चालकाविरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.