ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या कारवर पुण्यात दगडफेक करत हल्ला करण्यात आला. यावेळी कारमध्ये वागळेंसोबत अॅड. असीम सरोदे आणि डॉ. विश्वंभर चौधरीही होते.हल्ल्यादरम्यान कारवर शाईफेक आणि अंडीफेकही करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा ‘निर्भय बनो’च्या समर्थकांचं म्हणणं आहे. निखिल वागळे पुण्यात ‘निर्भय बनो’च्या कार्यक्रमासाठी व्याख्याता म्हणून उपस्थित राहण्यासाठी जात असताना हा हल्ला करण्यात आला.. पुण्यातील खंडोजीबाबा चौकात निखिल वागळेंचं वाहन अडवून, भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि शाईफेक करत हल्ला केला. या हल्ल्यात वागळे बसलेल्या वाहनाच्या काचा फुटल्या आहेत.
या हल्ल्यानंतरही निखिल वागळे ‘निर्भय बनो’च्या कार्यक्रमात पोहोचले.
‘लढा लोकशाहीचा, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा’ असं म्हणत डॉ. विश्वंभर चौधरी आणि अॅड. असीम सरोदे हे महाराष्ट्रभर ‘निर्भय बनो’च्या सभा घेत आहेत. याच सभेसाठी पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आले होते. पुण्यातील साने गुरूजी स्मारकातील निळू फुले सभागृहात ही सभा पार पडली.
पुणे पोलिसांनी काय माहिती दिली?
पुणे पोलिसांनी बोलताना सांगितलं की, “कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तरीही ते (निखिल वागळे) येऊ इच्छित होते, म्हणून आम्ही इथे बंदोबस्त केला होता. इथे येताना कुणीतरी दगडफेक केली. आरोपींना शोधून कारवाई करू.” डेक्कन पोलीस ठाणे आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात हल्ल्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही पोलीस म्हणाले. निखिल वागळेंवर हल्ला करणाऱ्यांपैकी 26 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलीय.
जिवंत असेपर्यंत संघर्ष करणार – वागळे
या सभेला उपस्थित राहिल्यानंतर भाषणात निखिल वागळे म्हणाले की, “आमचा वाहनचालक वैभव आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रशांत जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना अंगावर घेतलं, म्हणून आम्ही आज जिवंत आहोत. कारण हल्लेखोरांचा गट आमच्या वाहनावर अक्षरश: चढलं होतं आणि फोडाफोडी केली.” “जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, तोपर्यंत आम्ही संघर्ष करणार. या भारताचा ‘हिंदू पाकिस्तान’ होऊ देणार नाही. ही साधी लढाई नाही, ही फॅसिझमविरोधातली लढाई आहे,” असंही वागळे म्हणाले. “जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर आणि सर्व संतांचा आशीर्वाद आहे, तोवर तुम्ही आम्हाला संपवू शकत नाही,” असं वागळे म्हणाले.