भाजपाकडून शरद पवारांना केंद्रात या मंत्रीपदाची ऑफर
शरद पवार अजित पवारांच्या गुप्त भेटीची इनसाईड स्टोरी समोर, अजित पवारांवर भाजपाचा दबाव?
कोल्हापूर दि १४(प्रतिनिधी)- शरद पवार यांनी अजित पवारांसोबत झालेल्या गुप्त भेटीवर स्पष्टीकरण दिले असले, तरीही राजकीय चर्चा जोरात सुरु आहेत. कारण अजित पवार ज्या पद्धतीने माध्यमांना चिवट देत होते, त्याचे कारण काय असा सवाल उपस्थित होत आहे. पण आता अजित पवार यांनी शरद पवार यांना दोन मोठ्या आॅफर दिल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण सध्या कोल्हापूरच्या दाैऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी दोन पवारांच्या भेटीवर मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले “शरद पवारांना भाजपने केंद्रीय कृषिमंत्री पद आणि नीती आयोगाच्या अध्यक्ष पदाची ऑफर दिली आहे. त्याचबरोबर जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही सत्तेत सामावून घेण्याची ऑफर देण्यात आली आहे. पण माझ्या माहितीनुसार, शरद पवार यांनी अजित पवारांनी दिलेली ऑफर नाकारली आहे. असे चव्हाण म्हणाले आहेत. अजित पवार हे काही दिवसापुर्वी दिल्लीला गेले होते. त्यावेळी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवारांकरवी हा प्रस्ताव पाठवला होता. असा दावाही त्यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांची लाट ओसरल्यामुळे भाजपा असे प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले आहेत. कारण आपली आता जादू चालेना त्यामुळे मोदी आता माझ्यावर अवलंबून राहू नका असं सांगत आहेत. लोक आता मोदींना प्रश्न विचारत आहेत. मोदींच फोटो घेऊन गेला तर लोक प्रश्न विचारणारच, असंही चव्हाण यांनी सांगितले आहे. दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुका झाल्याच तर त्या कशा होतील हे देखील सांगता येत नसल्याचा दावाही चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. तसेच अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अजित पवार यांनी काही आमदारांसह राष्ट्रवादीत बंड केले आहे. अजित पवार आल्यानंतर शरद पवारही आपल्यासोबत येतील असं भाजपला वाटत होते. पण शरद पवार यांनी त्याला नकार दिला आहे. त्यामुळे भाजप वेगवेगळे प्रस्ताव देत शरद पवारांची मनधरणी करत आहे. त्याचबरोबर अजित पवारांवर देखील दबाव टाकला जात आहे.