Latest Marathi News
Ganesh J GIF

शरद पवार यांनी टाकला डाव, मुख्यमंत्रीपदाबाबतचे पत्ते उघड ?

मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणं हा धोका आहे. मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राने उद्धव ठाकरे यांचं काम पाहिलं आहे. बऱ्याच अंशी उद्धव ठाकरे यांना पाहूनच लोकसभेला मतदानही झालं आहे.त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे, असं सांगत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांची घोषणा करण्याची अप्रत्यक्ष मागणी केली होती. त्यावर उद्ध व ठाकरे यांनी सावध प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा असल्याचं म्हटलं होतं. आज माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी याबाबतचे आपले पत्ते उघडे केले आहे. शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

शरद पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलं. आमची आघाडी आहे. हा आमचा सामुदायिक चेहरा आहे. कोणत्याही व्यक्तीबिक्तीबाबत आमचा निर्णय झाला नाही. सामूहिक नेतृत्व हे आमचे सूत्र आहे, असं शरद पवार यांनी जाहीरपणे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार नसल्याचं उघड झालं आहे. निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत अतिशय मार्मिक प्रतिक्रिया देऊन मोठा डाव टाकल्याचंही बोललं जात आहे.शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका केली. एखाद्या गोष्टीला 100 रुपये खर्च असेल आणि माझ्या खिशात 70 रुपये असेल तर मग खर्च कसा करणार? असा सवाल शरद पवार यांनी केला. तुमच्याकडे महसूली जमा किती आहे. महसूली खर्च किती होणार आहे, जरुरीपेक्षा जास्त खर्चाचा गॅप कसा भरणार हे न सांगता आम्ही करु या म्हणण्याला फारसा काही अर्थ उरत नाही. एकंदरीतच हा अर्थसंकल्प विधानसभेच्या तोंडावर केलेला हा शब्दांचा फुलोरा आहे. असे शरद पवार म्हणाले.

महसूल तूट, एकंदर लागणारी आवश्यकता, या तीन गोष्टींची आकडे बघितले तर अपेक्षापेक्षा किती तरी कमी तरतूद असल्याचे दिसून येते. एका दृष्टीने हा अर्थसंकल्प लोकांना काही तरी भयंकर करतो हे दाखविण्याचा प्रकार आहे. माझी खात्री आहे की लोकांचा यावर विश्वास नसल्याचे ते म्हणाले. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या गोष्टी मांडण्यात आल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी कितपत होईल, यावर शंका असल्याचं त्यांनी म्हटलं. अर्थसंकल्पातील बाबी आधीबाहेर येता कामा नयेत त्याला अर्थसंकल्प फुटला असे म्हणतात. त्यांनी काल अर्थसंकल्प मांडला पण त्याच्या आदल्या दिवशीच अर्थसंकल्पात काय काय येणार आहे याची माहिती वर्तमानपत्रात छापून आली होती. या अर्थसंकल्पातील अनेक महत्वाच्या गोष्टी बजेट मांडण्याआधीच बाहेर आल्या होत्या. याचाच अर्थ असा की अर्थसंकल्पाची गुप्तता पाळण्यात आली नाही. असेही ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीचेही चित्र असेल. आमच्या आघाडीत सामूहिक नेतृत्व असेल. लोकसभा निवडणुकीत आम्ही 48 पैकी 31 जागा जिंकल्या. सरकारने आमचा धसका घेतला आहे. मोदींनी राज्यात 18 सभा घेतल्या. पण सभा घेतलेल्या 14 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. मोदीच्या कामावर जनता खुश नाही, असा चिमटा त्यांनी काढला.आता राज्यात पुढील तीन महिन्यातच निवडणुका होणार आहेत या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. तसेच ज्या गोष्टी प्रत्यक्षात येणार नाहीत त्या गोष्टी या बजेटमध्ये सांगण्यात आल्या आहेत. जमा, महसुली तूट आणि निधीची आवश्यकता याचा विचार केला तर आवश्यकतेपेक्षा कितीतरी कमी निधीची उपलब्धता आहे. माझी खात्री आहे की लोकांचा या अर्थसंकल्पावर विश्वास बसणार नाही, असा दावा त्यांनी केला.

 

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!