
‘जळी स्थळी चारसो पारचा नारा दिल्यानंतर ते साध्य करणे नरेंद्र मोदी सरकारला शक्य झालं नाही. याचे कारण म्हणजे दहशतीला पुरोगामी महाराष्ट्र कधीही बळी पडला नाही व पडणार नाही. लोकशाही देशांमध्ये दडपशाहीला कुठेही स्थान नाही हे आगामी निवडणुकीतही अधिक स्पष्ट होईल’, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.जकातवाडी, ता. सातारा येथे मंगळवारी भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, ‘उपराकार’ लक्ष्मण माने उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘राज्य शासनाने विविध योजना जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे. शासकीय पातळीवर योजना राबविताना त्याच्या निधीच्या तरतुदीबाबत आवश्यक असलेले गांभीर्य विद्यमान सरकारकडे नाही. परिणामी, अंदाजपत्रक मंजूर न करता जाहीर करण्यात आलेल्या या योजना भविष्यात फार काळ टिकतील, अशी शक्यता वाटत नाही. एकीकडे मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा करताना दुसरीकडे त्यासाठी निधीची तजवीज हा मोठा प्रश्न असणार आहे.’
घरातल्या लाडक्या बहिणीशी वितुष्ट घेऊन बाहेरील बहिणींना लाडकी करण्याचा या सरकारचा डाव विधानसभेला उपयुक्त ठरेल काय, या प्रश्नावर ‘कोणाच्या का असेना बहिणीला मदत करा म्हणजे झालं,’ असा टोला शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.तुतारी वाजवणारा माणूस आणि ट्रंपेट या निवडणूक चिन्हातील साधर्म्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. राज्यात काही ठिकाणी त्यातही नाशिक आणि सातारा या दोन्ही ठिकाणी हे प्रकर्षाने जाणवल्याचे पवार यांनी सांगितले.