मेकअप आर्टिस्ट होण्याचे स्वप्न घेऊन पुण्याकडे निघाली पण वाटेतच घडला अनर्थ
इंजिनियर झालेल्या अवंतीच्या स्वप्नांची राख रांगोळी, आईचा आक्रोश टाहो फोडणारा, अंवतीसोबत काय घडले
बुलढाणा दि १(प्रतिनिधी)- समृद्धी महामार्ग त्याच्या उद्घाटनापासूनच होत असलेल्या अपघातामुळे चर्चेत आहे. आज पहाटे झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात २५ जणांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. घटनास्थळी अनेकांचे नातेवाईक टाहो फोडता आहेत. पण आता अनेकांची स्वप्न काय होते, ते कशासाठी पुण्याला निघाले होते. याची कारणे समोर येत आहेत. त्यांची ती स्वप्न देखील बस अपघातात जळून खाक झाली आहेत.
विदर्भ बस अपघातात अवंती पोहनेकर या तरूणीचा मृत्यू झाला आहे. अवंती पोहनेकर ही वर्ध्याची असून ती इंजिनीअर होती. पण तिला मेकअप आर्टिस्ट आणि मॉडलिंगचा छंद होता. अवंतीच्या वडिलांचं ती लहान असतानाच निधन झालं. त्यानंतर तिची आई प्रणिता यांनीच अवती आणि तिची बहीण मोनू यांचा सांभाळ केला. इंजिनियरिंग पूर्ण केल्यानंतर करिअर करण्यासाठी ती पुण्याला निघाली होती. शिवाय तिला मेकअप आर्टिस्ट म्हणून देखील नाव कमवायचे होते. पण समृद्धी महामार्गावरचा प्रवास तिच्यासाठी समृद्धी नाहीतर काळ बनून आला आणि ती झोपेत असतानाच होरपळून तिचा मृत्यू झाला. सर्वात दुखद म्हणजे ज्या मुलीला आईने वडिलांच्या मृत्यूनंतर तळहाताच्या फोडासारखे जपले तिचा चेहरासुद्धा पाहता येणार नाही. कारण होरपळून मृत्यू झाल्यामुळे डीएनए टेस्ट करून मृतदेहाची ओळख पटवली जाणार आहे. घरच्यांना सिंदखेड राजा येथून अवंतीच्या मृत्यूची माहिती मिळाली पण, अवंतीचा शोध नातेवाईकांकडून अजूनही घेतला जात आहे. पण अवंतीच्या आईचा टाहो अनेकांचे काळीज हेलवणारा ठरला आहे.
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शनिवारी मध्यरात्री १ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास भीषण अपघात झाला. या बसमधून ३३ प्रवासी प्रवास करत होते. शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही बस नागपूरवरुन पुण्यासाठी निघाली होती. बस पलटी झाल्याने डिझेल टँक फुटला आणि बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.