मुंबई दि २५ (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबतच्या ठरावाची कागदपत्रे राज्यपालांच्या सचिवालयाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. त्यामुळे या सरकारच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली होती. त्यांनी शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेच्या कार्यकारी मंडळाने मंजूर केलेल्या व विधानसभा सचिवालयात सादर केलेल्या अधिकृत ठरावाची छायांकित प्रमाणित प्रत मिळावी. त्यासोबत शिवसेनेने भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत भाजपच्या कार्यकारी मंडळाने मंजूर केलेल्या व विधानसभा सचिवालयात सादर केलेल्या अधिकृत ठरावाची छायांकित प्रमाणित प्रत मिळावी. अशी माहिती मागितली होती. त्यावर राज्यपाल सचिवालयातील सामान्य माहिती अधिकारी विक्रम निकम यांनी या मुद्यांची माहिती आमच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याचे उत्तर त्यांना दिले आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी कोणत्या मुद्याच्या आधारे शिंदे आणि फडणवीस यांना सरकार स्थापनेची परवानगी दिली,असा प्रश्न जाधव यांनी केला आहे.
राज्यपाल सचिवालयाने दिलेल्या या माहितीनंतर राज्यातील एकनाथ शिंदे गट,भाजप काय करणार याची उत्सुकता असणार आहे तर महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मुद्द्यावर आक्रमक होण्याची शक्यता आहे.