Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे गटाचा ‘हे’ खासदार लवकरच बीआरएस प्रवेश करणार?

बीआरएसचा सत्ताधारी पक्षालाच धक्का, मतदारसंघाची समीकरणे बदलणार, बीआरएसचा वेगाने विस्तार?

शिर्डी दि १७(प्रतिनिधी)- के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती आपला महाराष्ट्रात अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने विस्तार करत आहे. माजी आमदार आणि खासदारांना आपल्या पक्षात सामील केल्यानंतर आता बीआरएसने आपला मोर्चा विद्यमान आमदार आणि खासदारांकडे वळवला आहे. त्यातच शिंदे गटाच्या खासदाराने बीआरएस पक्षाच्या निवासस्थानी थेट नेत्यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भारत राष्ट्र समितीचे तेलंगणातील खासदार बी. बी. पाटील यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हे देखील आवर्जुन उपस्थित होते. त्यामुळे लोखंडे लवकरच बीआरएसमध्ये जाणार अशी चर्चा सुरु झाली आहे. तसे पाहिले तर सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन २०१४ आणि २०१९ ला शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले. ते शिवसेना शिंदे गटासोबत आहेत. २०२४ साठी शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळेल, असे बोलले जात असले तरी लोखंडे यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी वाढल्याचीही चर्चा आहे. त्यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी याआधीही या मतदारसंघातून निवडणूक लढली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघावर दावा ठोकल्याने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान शिर्डी लोकसभा आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने लोखंडे यांच्याकडून काही चाचपणी तर नाही ना अशी चर्चा रंगली आहे.

दुसरीकडे लोखंडे आपल्या मुलाला श्रीरामपूरमधून विधानसभेला उतरवण्याची चर्चा आहे. कारण लोखंडे २००९ साली मुंबईतून मनसेकडून निवडणूक लढत असताना पराभूत झाले होते. त्यावेळी मुरकुटे यांनीच त्यांना शिर्डीत आणले होते. त्यामुळे मुरकुटे यांची सदिच्छा भेट घेतली की, संसदेत बी.बी.पाटील खासदार असल्याने लोखंडे यांनी त्यांची भेट घेतली अशी शक्यताही व्यक्त होत आहे. दरम्यान खासदार सदाशिव लोखंडे यांनी याबाबत कोणतिही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!