मोदींच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाला मिळणार इतकी मंत्रीपदे
जुलैमध्ये मोदी सरकारचा महाविस्तार, अनेकांना मिळणार नारळ, शिंदे गटात हे होणार मंत्री
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारला मोदी सरकारनं खास भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या वाट्याला एक कॅबिनेट एक राज्यमंत्री पद मिळणार असल्याची माहिती आहे. मोदी सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यामध्ये शिंदे गटाला झुकते माप दिले जाणार आहे.
एकनाथ शिंदे सरकारला शिवसेनेच्या १३ खासदारांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे कोणाला मंत्रीपद द्यायचे याचा निर्णय एकनाथ शिंदे घेणार आहेत. काल रात्री याच कारणासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले होते. मोदी सरकारचा हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. त्यामुळे सर्व समीकरणे लक्षात घेऊनच विस्तार होणार आहे. महाराष्ट्रात भाजपाने मिशन ४५ चे लक्ष ठेवले आहे. त्यामुळे शिंदे गटाची साथ भाजपाला गरजेची आहे. त्यासाठीच आपल्या वाट्याची मंत्रीपदे भाजपाला देणार आहे. मोदींनी पुढील आठवड्यात मंत्रिपरिषदेची बैठक बोलवली आहे. यात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलाबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर केंद्रीय पातळीवर भाजपच्या संघटनात्मक बदल होणार असल्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींनी खरोखरच फेरबदल करण्याचा निर्णय घेतला तर ते केवळ कॅबिनेट मंत्र्यांपुरते मर्यादित राहणार नाही. अनेक राज्यमंत्रीही बदलले जाणार आहेत. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे. त्याआधीच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल अचानक दिल्लीत गेल्याने या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. केंद्रातील महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना डच्चू देऊन शिंदे गटाला दोन मंत्रिपदे देण्यात येणार असल्याची बातमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्या दोन मंत्र्यांचा शिंदे गटासाठी बळी जाणार याचीच चर्चा आता रंगली आहे. शिंदे गटाकडून राहुल शेवाळे, गजानन किर्तीकर, प्रतापराव जाधव यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.