
भारताला धक्का! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बाँम्ब
भरमसाठ टॅरिफबरोबर दंडही ठोठावणार, १ ऑगस्टपासून निर्णय होणार लागू, मोदी अडचणीत
दिल्ली – अमेरिकेने भारताला एक मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेनं भारतावर २५ टक्के टॅरिफ लावला आहे. येत्या एक ऑगस्टपासून या नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे, दोन्ही देशांमध्ये सर्व काही ठीक नाही असंही यावेळी ट्रम्प यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भारतीय बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराबाबत बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. आता ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर याबद्दल माहिती दिली आहे. या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत भारताची अमेरिकेला होणारी निर्यात २२.८ टक्क्यांनी वाढून २५.५१ अब्ज डॉलर्स झाली आहे. तर, आयात ११.६८ टक्क्यांनी वाढून १२.८६ अब्ज डॉलर्स झाली आहे. भारत हा आपला मित्र देश असला तरी देखील आपण त्यांच्याशी तुलनेनं कमी व्यावसाय केला आहे. कारण त्यांचे आयात शुल्क जगातील सर्वात जास्त आहे आणि त्यांच्याकडे सर्वात कठीण आणि त्रासदायक गैर आर्थिक व्यापार अडथळे आहेत. तसंच, त्यांनी त्यांचे बहुतांश लष्करी साहित्य रशियाकडून खरेदी केलं आहे. ते रशियाच्या ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत. चीनसह ज्यावेळी सर्वजण रशियाला युक्रेनमधील हिंसा थांबवण्यास सांगत आहेत, हे सर्व काही चांगले नाही, त्यामुळे भारताला एक ऑगस्टपासून २५ टक्के आयात शुल्क तसंच वरील कारणासाठी दंड आकारला जाईल, याकडं लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद, असं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे. दरम्यान याशिवाय पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी भारताने त्यांच्या सांगण्यावरुन पाकिस्तानसोबत युद्धबंदी केल्याचा दावा पुन्हा एकदा केला आहे. त्यांनी भारताला पाकिस्तानसोबतचा संघर्ष संपवण्याचे आवाहन केले होते यामुळे हा मोठा संघर्ष थांबला असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे भारताने यावर स्पष्टपणे नकार देऊनही ट्रम्प सतत हा मुद्दा उस्थित करत आहेत. आतापर्यंत, भारत सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. नवीन आयात शुल्काचा अमेरिकेतील भारतीय निर्यातीवर मोठा परिणाम होऊ शकतो, जी २०२४ मध्ये जवळपास $१०० अब्ज होती.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या अर्थशास्त्रीय धोरणाच्या केंद्रस्थानी टॅरिफ आहे. अमेरिकेतल्या आयात आणि निर्यातीतली त्रुटी कमी करून देशात व्यापार संतुलन आणणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. दरम्यान आता येत्या काळात वाटाघाटी होण्याची शक्यता आहे.