धक्कादायक ! प्लॉट घेण्यासाठी दिलेले पैसे परत न केल्याने भावांमध्ये वाद ; रागात मोठ्या भावानेच केला लहान भावाचा खून
भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. प्लॉट घेण्यासाठी दिलेले पैसे परत न केल्याने झालेल्या वादामुळे मोठ्या भावाने आपल्या सख्ख्या भावाच्या डोक्यात बॅटने जोरदार वार केला. यात लहान भावाचा जागीच मृत्यू झाला. प्रदीप जयसिंग इंगळे (वय ४८) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. सतीश जयसिंग इंगळे असे अटकेतील आरोपी भावाचे नाव आहे.
घटनेबाबत असे की, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये पर्यवेक्षक म्हणून प्रदीप जयसिंग इंगळे नोकरीला आहेत. वरणगाव आयुध निर्माणीच्या वसाहतीत क्वार्टर क्रमांक ४४ टाईप थ्रीमध्ये प्रदीप इंगळे वास्तव्यास होते. दरम्यान ११ सप्टेंबरला ते दुपारी जेवणासाठी घरी आले होते. याच वेळी त्यांचा मोठा भाऊ सतीश इंगळे हा त्यांच्या घरी आला होता. दरम्यान, मयताला प्लॉट घेण्यासाठी साडेपाच लाख रुपये दिल्यानंतर ते परत न केल्याने यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यात सतीशने प्रदीप यास मारहाण करण्यास सुरवात केली. यातच सतीशने प्रदीपच्या डोक्यात बॅटने वार केला. यामध्ये प्रदीपचा मृत्यू झाला.
दरम्यान घटना घडल्यानंतर सतीश हा प्रदीपच्या मृतदेहाजवळ बसून होता. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर भुसावळचे पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे, वरणगावचे सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी, उपनिरीक्षक गांगुर्डे, उपनिरीक्षक सुशील सोनवणे, हवालदार संदीप बनसोडे, सुखराम सावकारे, होमगार्ड राम चौधरी, महेश चौधरी आदींनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सतीशला ताब्यात घेतले.