“माझ्यावर गुन्हा दाखल करु नका नाहीतर मी जीवच देईल”, असे म्हणत आरोपीचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न
पुणे ग्रामीण पोलीस दलातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, त्यानंतर आरोपीला पोलीस स्टेशन आणले , यावेळी गुन्हा दाखल केला तर मी जीव देईल असे म्हणत एका आरोपीने खिडकीवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परमेश्वर नागनाथ धेवडे असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती नुसार पुणे ग्रामीण पोलीस दलातील शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस हवालदार बापू हाडगळे, पोलीस शिपाई प्रतिक जगताप, महिला पोलीस शिपाई काजल सरोदे हे त्यांचे कर्तव्य बजावत असताना एका युवतीचा मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना नागरिकांनी पकडून आणले. यावेळी परमेश्वर धेवडे याने फिर्यादी युवतीला” तुला नवीन मोबाईल देतो” असे म्हणत आरडाओरडा करुन पोलिसांना “माझ्यावर गुन्हा दाखल करु नका नाहीतर मी जीवच देईल” असे म्हणत पोलीस ठाण्यातील खिडकीवर जोरात डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, यावेळी आरोपीच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव होऊ लागल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
याबाबत पोलीस शिपाई प्रतिक भाऊसाहेब जगताप यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी परमेश्वर नागनाथ धेवडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहे. तर मोबाईल चोरीच्या गुन्हातील आरोपींच्या नातेवाईकांकडून देखील पोलीस स्टेशन परिसरात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा ऐकायला मिळतात आहे.