पुणे –जेवणानंतर शतपावली करण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकाच्या चेहर्यावर धारदार शस्त्राने वार करुन चेहरा छिन्नविछीन्न करुन निर्घुण खून केल्याची घटना हडपसरमध्ये घडली आहे. वासुदेव रामचंद्र कुलकर्णी (वय ४७) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
याबाबत त्यांचे भाऊ विनायक रामचंद्र कुलकर्णी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी रात्री साडेदहा ते सोमवारी पहाटे २ वाजेच्या दरम्यान उत्कर्षनगर सोसायटीसमोरील फुटपाथवर घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ वासुदेव कुलकर्णी हे ईझी १ फायनान्सिल सर्व्हिसेस ही गृहकर्ज करुन देणारी एजन्सी चालवितात. त्यांचे कार्यालय शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळील बगुनिका अपार्टमेंट येथे आहे. रविवार असल्याने वासुदेव कुलकर्णी हे दिवसभर घरीच होते. जेवण झाल्यानंतर त्यांना शतपावली करण्याची सवय आहे. रात्री २ पर्यंत ते शतपावली करुन घरी येतात.
नेहमीप्रमाणे रविवारी रात्री साडेदहा वाजता ते शतपावली करण्यासाठी गेले होते. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी वैशाली हिच्या मोबाईलवर उत्कर्षनगर सोसायटीचे फुटपाथवर वासुदेव बेशुद्धावस्थेत पडलेला असल्याची माहिती मिळाली. तेव्हा फिर्यादीसह सर्व जण बाहेर आले. तोपर्यंत पोलीसही पोहचले होते. फिर्यादी यांनी पाहिल्यावर कोणीतरी धारदार शस्त्राने चेहर्यावर वार करुन चेहरा छिन्नविछीन्न केला होता. रुग्णवाहिकेतून त्यांना ससून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत्यु झाल्याचे घोषित केले. खूनामागील नेमके कारण अद्याप समोर आले नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे (Sr PI Santosh Pandhre) अधिक तपास करीत आहेत.