राज्यात आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. असे असताना मोहोळ शहरातील महिला डॉक्टराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (दि. १ ) दुपारी २ वाजता घडली. डॉ. रश्मी संतोष बिराजदार असे मृत डॉक्टराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील मोहोळ मल्टी स्पेशालिटी हे तीन मजली हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर डॉ. रश्मी बिराजदार या पती आणि दोन मुलांसमवेत राहात होत्या. सकाळी नेहमीप्रमाणे पती संतोष बिराजदार हे स्वतःच्या दुकानामध्ये काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी दुपारच्या सुमारास हॉस्पिटलमधील कर्मचारी सलीम मकानदार याने संतोष बिराजदार याला संपर्क करुन मॅडम यांनी घरामध्ये गळफास घेतल्याची माहिती दिली. घटनेची माहिती होताच संतोष बिराजदार यांनी घराकडे धाव घेतली. डॉ. रश्मी बिराजदार यांना बेशुद्धावस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि डॉ.रश्मी यांचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. याबाबत मोहोळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी एक चिठ्ठी आढळून आली आहे. त्या चिठ्ठीत, ‘मुलांना सांभाळा, मला माफ करा’ असा मजकूर असल्याचे सांगण्यात आले आहे. डॉ. रश्मी बिराजदार बीएएमएसची पदवी प्राप्त डॉक्टर आहेत. त्या गेल्या दहा वर्षांपासून डॉ. रश्मी बिराजदार या रुग्णांची सेवा करत होत्या. सध्या त्या मोहोळ तालुक्यातील शहराच्या ठिकाणी नव्यानेच सुरु झालेल्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात काम करत होत्या. त्यांचे पती संतोष बिराजदार यांचा स्वतंत्र व्यवसाय आहे.