
“ढेकळांचे पंचनामे करायचे का?” कृषीमंत्री कोकाटे बराळले
कृषीमंत्री कोकाटेंकडून शेतक-यांचा अपमान, फडणवीसांच्या आदेशाला केराची टोपली, वाद पेटणार?
नाशिक – कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सतत वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे वादग्रस्त विधानामुळे वादात अडकले आहेत. शेतकरी वर्गातून कोकाटेंचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात कांदा, द्राक्षे, आंबा, भुईमूग अशा महत्त्वाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कोकाटे यांनी नुकसानीच्या पंचनाम्यांसंदर्भात दिलेलं वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरले आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कोकाटे म्हणाले की, शेतात जी पिके उभी आहेत किंवा नुकतीच काढणीस आलेली आहेत, त्यांचेच पंचनामे केले जातील. जे कांदे किंवा इतर पीक शेतकरी घरात घेऊन गेले आहेत, त्यांचं पंचनामे करणे शक्य नाही. “हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?” ते नियमात बसत नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केले. मागील आठवडाभरात महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतात असणारे पिके सडली गेली. कांदा, आंबा भुईमुंगाच्या शेंगासह सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आळेला घास पावसामुळे हिरावला गेल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. फडणवीस सरकारकडून नुकसान झालेल्यांना भरपाई मिळेल, अशी घोषणा करण्यात आली. लवकरच नुकसानीचे पंचनामे केले जातील, पण त्याआधीच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानामुळे वाद उफाळला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरपाई जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात पंचनाम्यांची अंमलबजावणी, निकष आणि निर्णय प्रक्रिया यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. कोकाटेंच्या वक्तव्यामुळे सरकारच्या संवेदनशीलतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. आता विरोधक कोकाटेंच्या या विधानावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कोकाटे यांचे हे विधान शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणारे असल्याचे मत विरोधकांकडून मांडले जात असून, यावरून राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोकाटे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांना भिकारी संबोधून आणि कर्जमाफीच्या रकमेचा वापर लग्नासाठी होतो, असे विधान करून वाद ओढवून घेतला होता. या ताज्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी आणि शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, कोकाटे यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचा दावा केला आहे.