”मुखातून श्रीराम म्हणतोय,घरात महाभारत चाललंय”अजित पवारांवर घरातीलच व्यक्तींनी केली टीका, बघा सविस्तर बातमी
बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरूद्द पवार लढत होणार आहे. या लढतीत अजित पवारांनी कुटुंबातून एकटे पडल्याची भावना व्यक्त केली होती. तर संपूर्ण कुटुंब शरद पवारांच्या बाजूने उभे असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे मोठे बंधु श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर टीका केली होती. या टीकेनंतर आता श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी ”मुखातून श्रीराम म्हणायच आणि घरात महाभारत चाललंय” असे विधान करत अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर हल्ला चढवलाय.
शर्मिला पवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी गावभेटी देत होत्या. या दरम्यान गावकऱ्यांना आवाहन करता शर्मिला पवार म्हणाल्या, ‘त्यांना निवडून द्यायचं की नाही द्यायचं हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे. मी आता कितीही तुम्हाला म्हटलं इथे आता विहीरी पाडल्या आहेत, म्हणून तुम्ही मतदान करा. तुम्ही करणार नाहीत, कारण तुम्ही जाणते आहात. तुम्हाला देखील माहितीय आज काय घडतेय, मुखातून श्रीराम म्हणतोय, पण घरामध्ये काय चालू आहे, रामायण चालू आहे की महाभारत चालू आहे, असे शर्मिला पवार म्हणाल्या आहेत. एका अनोळखी व्यक्तीला मतदान करण्यापेक्षा एक जो आपल्याला माहितीचा उमेदवार आहे, त्याला मतदान करा, असे आवाहन शर्मिला पवार यांनी मतदारांना केले आहे. तसेच तुम्हाला माहितीय त्या कोण आहेत? त्यांच काम काय आहे? त्यांचे वडील कोण आहेत? त्या लेकीला आपण पुन्हा एकदा संधी द्यायची आहे. ताईंना साहेबांना आपल्याला विजयी करायचं आहे. ताईंना पुन्हा एकदा आपल्याला संसदेत पाठवायचं आहे, अशी साद शर्मिला पवार यांनी मतदारांना घातली आहे.
दरम्यान याआधी अजित पवारांविरूद्ध त्यांचे मोठे बंधु श्रीनिवास पवार यांनी टीका केली होती. मी आजवर अजित पवारांसोबत होतो. मी नेहमी त्यांना साथ दिली. आमच्यावर शरद पवार साहेबांचे खूप उपकार आहे. जे काही पदे मिळाली ते शरद पवार साहेबांमुळेच मिळाली. त्यांचे वय देखील आता 83 आहे. अशावेळी शरद पवार साहेबांची साथ सोडणं मला अजिबात पटलं नाही. मी चांगल्या वाईट काळात अजित पवारांना साथ दिली. स्वार्थासाठी जो घरातल्या वयस्कर माणसाची किंमत करत नाही, त्याच्यासारखा नालायक माणूस नाही, अशी टीका त्यांनी केली होती. दरम्यान युगेंद्र पवार देखील बारामतीत शरद पवारांच्या बाजूने गावभेटी घेऊन प्रचार करत आहेत. त्यामुळे श्रीनिवास पवार यांचे अख्खं कुटुंबच अजित पवारांविरूद्ध मैदानात असल्याचे चित्र आहे.