शुभमन गिलने द्विशतक ठोकताच केली अनेक विक्रमांची नोंद
गिलने मोडले अनेक विश्वविक्रम, क्रिकेटच्या देवालाही टाकले मागे, कोणते केले विक्रम?
हैद्राबाद दि १८(प्रतिनिधी)- भारताचा सलामीवीर शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत तडाखेबाज द्विशतक झळकावले.गिलने द्विशतक झळकावल्यानंतर त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. त्यामुळे या सामन्यात सबकुछ शुभमन गुलाबराव असेच चित्र होते. त्याचबरोबर शुभमनच्या या खेळीमुळे तो विश्वचषकासाठीच्या शर्यतीत आघाडीवर आला आहे.
शुभमन गिलने आजच्या सामन्यात द्विशतकी खेळी केली. तसेच त्याने आपल्या एक हजार धावा देखील पूर्ण केल्या आहेत. सर्वात कमी वयात द्विशतक करण्याचा विक्रम गिलच्या नावावर जमा झाला आहे. तसेच वेगवान एक हजार धावा पूर्ण करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. न्यूझीलंड संघाविरुद्ध द्विशतक करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी न्यूझीलंड विरोधात सचिन तेंडुलकरने केलेल्या १८६ धावा सर्वाधिक होत्या. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर वनडे क्रिकेटमध्ये झालेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी या मैदानावर २००९ साली सचिन तेंडुलकरने १६९ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा तो जगातील आठवा तर भारताचा पाचवा फलंदाज आहे. भारताकडून याआधी सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी अशी कामगिरी केली आहे.
शुभमन गिल वनडेत द्विशतक करणारा सर्वात युवा क्रिकेटपटूही ठरला आहे. त्याने जेव्हा द्विशतक केले, तेव्हा त्याचे वय २३ वर्षे १३२ दिवस होते. त्याने या विक्रमाच्या यादीत ईशान किशनला मागे टाकले आहे. किशनने २४ वर्षे १४५ दिवस वय असताना द्विशतक केले होते. दरम्यान शुभमन गिलच्या खेळीनंतर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर चर्चेत आली आहे. तिचे नाव अनेकदा शुभमन सोबत जोडण्यात आले आहे.