
या खासदाराच्या पत्नीच्या चाैकशीसाठी होणार एसआयटीची स्थापना?
खासदार पत्नीवर मुख्यमंत्र्यांचे गंभीर आरोप, कोण आहेत ते खासदार, प्रकरण काय?
दिल्ली – काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांची ब्रिटीश वंशीय पत्नी एलिझाबेथ कोलबर्न चर्चेत आल्या आहेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी गोगोई आणि एलिझाबेथ कोलबर्न यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
गौरव गोगोई यांच्या पत्नी एलिजाबेथ कोलबर्न यांच्या परदेशी नागरिकतेबरोबरच पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसोबत संबंध असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. सरमा म्हणाले की कोलबर्न या लग्नानंतर पाकिस्तानला गेल्या होत्या हे निश्चितपणे माहित होते परंतु त्यांचा नवरा त्यांच्यासोबत होता की नाही हे माहीत नव्हते. मात्र विविध माहिती बाहेर येत आहे. रविवारी मंत्रिमंडळ यावर चर्चा करेल आणि कदाचित एसआयटी स्थापन केली जाईल, असे सुतोवाच केले आहे. भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनीही पाकिस्तान नियोजन आयोगाचे माजी सल्लागार अली तौकीर शेख यांच्या नेतृत्वाखाली CDKN इस्लामाबादमध्ये त्यांनी काम केल्याचा दावा केला आहे. गौरव गोगोई आणि एलिझाबेथ यांची २०१० मध्ये भेट झाली होती. एलिझाबेथ या ब्रिटिश नागरिक असून या दोघांचं लग्न २०१३ साली झाले होते. भाजपकडून होत असलेल्या आरोपांवर गौरव गोगोई यांनी प्रतिक्रिया दिली, “माझी पत्नी ISI शी संबंधित असेल तर मी RAW शी संबंधित आहे”, असे म्हणाले आहेत.
एलिझाबेथ यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी घेतली आहे. सध्या त्या ऑक्सफर्ड पॉलिसी मॅनेजमेंटसाठी काम करतात. हिमंता बिस्वा सरमा यांनी गौरव गोगोई यांच्या पत्नीने १२ वर्षांपासून भारतीय नागरिकत्वही घेतलं नसल्याचाही दावा केला आहे.