शिंदे सरकारमधील ‘या’ मंत्र्यासमोरच ‘पन्नास खोके’ची घोषणाबाजी
शिवसैनिकांचा गनिमी कावा,अडवला या मंत्र्याचा ताफा
परभणी दि २५(प्रतिनिधी)- राज्यात सत्ताबदल होऊन बराच काळ होऊन गेला असला तरीही शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधातील रोष काही केल्या कमी होत नाही. मध्यंतरी दादा भुसे यांच्याविरोधात पन्नास खोके ओके अशा घोषणा दिल्या होत्या. पण आता शिंदे सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोरच शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे परभणी जिल्हा दौऱ्यावर होते. परभणी शहरातील कार्यक्रम संपवून ते पूर्णा शहराकडे मार्गस्थ झाले. त्यानंतर पूर्णेत शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी कृषीमंत्र्यांचा ताफा थांबविला. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, शेतमजून, कामगारांच्या हाताला कामे द्यावीत, पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम पालम, पूर्णा आणि गंगाखेड तालुक्यातील सरसगट शेतकऱ्यांना लागू करावी, लम्पी आजाराने बाधित जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत करावी, यासह अनेक मागण्यांचे निवेदन कृषीमंत्र्यांना दिले. पण त्यानंतर कृषीमंत्री सत्तार हे गाडीच्या दिशेने निघताच उपस्थित शिवसैनिकांनी पन्नास खोके, एकदम ओकेच्या घोषणा दिल्या. अचानक झालेल्या या घोषणाबाजीमुळे कृषीमंत्र्यांनी तेथून काढता पाय घेतला. पण अचानक झालेल्या या घोषणाबाजीमुळे गोंधळाचे वातावरण तयार झाले होते.
शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन तीन महिने झाले आहेत. पण हे सरकार प्रत्येकी पन्नास खोके घेऊन स्थापन झाल्याचा दावा महाविकास आघाडीकडून केला जात आहे. अगदी विधिमंडळातील पाय-यांपासून ते अगदी एखाद्या कार्यक्रमात मंत्र्यांसमोरच घोषणाबाजी करण्यात आली आहे. पण सत्तार यांच्यासमोर झालेल्या घोषणाबाजीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.