
अजबच! एका लिंबामुळे १५ लाखाच्या थारचा झाला चक्काचूर
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, घडलं ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का, नवी कोरी थार घेतली पण....
दिल्ली – नवी गाडी घेणं हे कोणत्याही मध्यम वर्गीय कुटुंबाचं स्वप्न असतं. गाडी घेताना कुटुंबाकडून पूजा-अर्चा केली जाते. नव्या गाडीच्या टायरखाली लिंबू ठेवून फोडलं जातं. मात्र दिल्लीत एका कुटुंबाला एका वेगळ्याच प्रसंगाला सामोरं जावं लागल आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दिल्लीतील महिलेने नवी थार विकत घेतली. पण लिंबू चिरडण्याच्या विधीमध्ये चुकून तिचा एक्सिलेटर पाय पडला आणि गाडी शोरूममधून खाली कोसळली. गाडीचा चक्काचूर झाला आणि शोरूमचे नुकसान झाले. थार ही अत्यंत लोकप्रिय गाड्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. ही गाडी चालवणं हे अनेकांचं स्वप्न असतं. एका महिलेने थार विकत घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं, पण शोरूमच्या बाहेर येण्यापूर्वीच या थारचा चक्काचूर झाला. दिल्लीतील निर्माण विहार भागात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. तब्बल १५ लाख रुपये किंमतीची नवी कोरी महिंद्रा थार शोरूमच्या पहिल्या मजल्यावरून काच फोडून थेट खाली कोसळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका २९ वर्षीय महिलेने नुकतीच १५ लाख रुपयांची थार एसयूव्ही खरेदी केली होती. गाडीची पूजा करण्यासाठी ती पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्ये पती आणि शोरूम कर्मचाऱ्यांसोबत गेली होती. शुभ मुहूर्तावर गाडीच्या चाकाखाली लिंबू चिरडण्याचा विधी सुरू असताना, महिलेने अचानक ॲक्सिलेटरवर पाय ठेवला. गाडी वेगात पुढे गेल्याने, तिने बाल्कनीची रेलिंग आणि काचेची भिंत तोडली. त्यानंतर गाडी सुमारे १५ फूट खाली कोसळली. या घटनेत गाडी पूर्णपणे उलटली. सुदैवाने, गाडीतील कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही, मात्र थार गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गाडीत बसलेल्यांपैकी कुणालाही फार गंभीर दुखापत झालेली नाही, असे सांगितलं जात आहे. या प्रकरणी अद्याप तक्रार दाखल झालेली नाही. दरम्यान, अपघातात जखमी झालेली मानी पवार आणि शोरुम कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही घरी सोडण्यात आले.
मनी पवार, पती प्रदीप आणि शोरूममधील कर्मचारी विकास हे थार गाडीत बसले होते. विकास गाडीचे फिचर्स त्यांना समजावून सांगत होता. गाडीतील सुरक्षा यंत्रणेमुळे महिलेला किरकोळ दुखापत झाली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेऊन चौकशी सुरू केली आहे.